माहीम-जोगेश्‍वरीतील दोन अपघातात महिलेसह तिघांचा मृत्यू

अपघातप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून दोन स्वतंत्र एडीआरची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, -माहीम आणि जोगेश्‍वरीतील दोन वेगवेेगळ्या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मंगला अशोक तांडेल, रमजान नासीर शेख आणि धु्रव मनोज गुरव यांचा समावेश आहे. याप्रकरणी माहीम आणि आंबोली पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. यातील एका अपघाताील आरोपी रिक्षाचालक घटनास्थळाहून पळून गेला तर दुसरा बाईकस्वार आरोपी धु्रव गुरव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिला अपघात रविवारी रात्री पावणेबारा वाजता जोगेश्‍वरीतील एस. व्ही रोड, मेमन कॉलनी, फारुख हायस्कूलसमोर झाला. झहीर मोहरम अली शेख हे मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत ठाण्यात राहतात. मृत रमजान हा त्यांचा पुतण्या असून तो त्यांच्यासोबत शिलाईचे काम करतो. रविवारी रमजान हा त्याच्या अंधेरीतील एका मित्राकडे आला होता. रात्री पावणेबारा वाजता तो फारुख हायस्कूलसमोरुन जात होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका रिक्षाने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

अपघातानंतर आरोपी रिक्षाचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होात. त्यामुळे त्याला त्याचा मित्र अक्रम मेहबूब पटेल याने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता रमजानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही माहिती प्राप्त होताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी झहीर शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर रिक्षाचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दुसरा अपघात रात्री सव्वानऊ वाजता माहीम येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर झाला. अशोक सुखदेव तांडेल हे माहीम कॉजवे परिसरात त्यांची पत्नी मंगला आणि दोन मुली सलोनी आणि सानिया यांच्यासोबत राहत असून ते एका बँकेत नोकरी करतात. सोमवारी सव्वानऊ वाजता त्यांची पत्नीसह दोन्ही रोडच्या पलीकडे राहणारा मेहुणा धनंजय धनू याच्या घरी जात होते. रस्ता ओलांडण्यासाठी ते तिघेही जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, वांद्रे येथे जाणार्‍या रस्त्यावर उभे होते. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका बाईकस्वाराने त्यांची पत्नी मंगला हिला जोरात धडक दिली.

जखमी झालेल्या मंगलाला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या रेहजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात बाईकस्वार धु्रव गुरव हादेखील जखमी झाला होता. त्यामुळे त्याला वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर रेहजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचाही नंतर मृत्यू झाला होता. अपघातानंतर माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अशोक तांडेल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ध्रुव गुरव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका महिलेसह स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page