वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना अटक

एकाला पंधरा तर दुसर्‍याला सत्तावीस वर्षांनी अटक करण्यात यश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जुलै २०२६
मुंबई, – जामिनावर बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना साकिनाका आणि जोगेश्‍वरी पोलिसांनी अटक केली. आयुब मोहम्मद सफात चौधरी आणि उमेश मुत्तूस्वामी गौडर अशी या दोघांची नावे आहेत. यातील आयुब हा गेल्या पंधरा वर्षांपासून तर उमेश हा सत्तावीस वर्षांपासून वॉण्टेड असल्याचे पोलिसांनी सांगितले. फेरअटक केल्यानंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

आयुब मोहम्मद हा अंधेरीतील साकिनाका, असल्फा मोहिली व्हिलेज, अण्णासागर चाळीत राहत होता. २०१० साली त्याच्याविरुद्ध १४३, १४५, १४७, १४९, ३३२, ३५३ भारतीय दंड सहिता कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने त्याच्या वकिलामार्फत कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच आयुब मोहम्मद हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याला कोर्टाने फरारी आरोपी घोषित करुन त्याच्याविरुद्ध स्टॅडिंग अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

गेल्या पंधरा वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना आयुब मोहम्मद हा विरार येथील सपकाळे नाका परिसरात स्वतचे अस्तित्व बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेत्रा सुळे, सहाय्यक फौजदार नंदकिशोर सांडव, पोलीस हवालदार अरविंद होळकर यांनी मोहम्मद आयुबला विरार येथून अटक केली.

दुसर्‍या कारवाईत जोगेश्‍वरी पोलिसांनी उमेश गौंडर या वॉण्टेड आरोपीस अटक केली. १९९८ साली त्याच्याविरुद्ध जोगेश्‍वरी पोलीस ठाण्यात ४५२, ४१७, ४२७, ३८० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर काही महिन्यांनी तो जामिनावर बाहेर आला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध अंधेरीतील लोकल कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. गेल्या २७ वर्षांपासून त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते.

याच दरमन तो डोबिवली परिसरात राहत असल्याची माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बसवंत कौरे, पोलीस हवालदार तानाजी सुतार यांनी त्याला डोबिवली येथून अटक केली. तिथे उमेशने स्वतचे एक घर घेतले होते. तेव्हापासून तो स्वतचे अस्तित्व बदलून राहत होता. अटकेनंतर दोन्ही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी उमेशला कोर्टाने दोन हजाराचा दंड, दहा हजाराचा रोख जामिन आणि पंधरा हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page