मशिनरी खरेदी व्यवहारात गुंतवणुकीच्या आमिषाने ९९ लाखांना गंडा
व्यावसायिक पित्यासह संचालक मुलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मशिनरी खरेदी व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची त्याच्याच व्यावसायिक मित्रासह त्याच्या मुलीने सुमारे ९९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अविनाश चंद्रकांत विरकर आणि केतकी अविनाश विरकर या दोघांविरुद्ध जुहू पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी एका खाजगी कंपनीत संचालक म्हणून काम करत असून अस्तित्वात नसलेल्या कंपनीसोबत व्यवहार सुरु असल्याचे बोगस दस्तावेज बनवून त्यांनी ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिराग महेंद्र शाह हे व्यावसायिक असून ते विलेपार्ले येथील जेव्हीपीडी स्किम परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा खडी सप्लायचा व्यवसाय असून त्यांची महालक्ष्मी मिलेनियम एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. विलेपार्ले परिसरात त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय असून कंपनीत त्यांच्यासह त्यांचे वडिल महेंद्र शाह हे संचालक म्हणून काम पाहतात. गेल्या वर्षी त्यांच्या काकाच्या माध्यमातून त्यांची अविनाश विरकरसोबत ओळख झाली होती. नोव्हेंबर अविनाश हा त्यांच्या राहत्या घरी आला होता. यावेळी त्याने त्याचा दुय्यम प्रतीची मशिनरी विकत घेऊन त्याची दुरुस्ती करुन मार्केटमध्ये विकण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. त्याची स्वतची एक खाजगी कंपनी असून त्यात त्याच्यासह त्याची मुलगी केतकी विरकर ही संचालक म्हणून काम करते. त्यांची कंपनीत सध्या प्रचंड प्रॉफिटमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करावी.
या गुंतवणुकीच्या पैशांतून ते काही मशिनरी खरेदी करणार असून त्यातून होणार्या फायद्यांतून त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. अल्पावधीत त्यांची चांगली मैत्री झाल्याने चिराग शाह यांनी त्याच्या कंपनीत गुंतवणुकीची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी अविनाशच्या कंपनीत जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ९९ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्याच्या कंपनीने चिराग शाह यांना चौदा वेळा पत्रव्यवहार करुन आतापर्यंत कंपनीने सुमारे सात कोटीचा व्यवहार इतर कंपन्यांसोबत केल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. या व्यवहारातून त्यांना ३ कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांचा प्रॉफिट झाला होता.
मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी कंपनीसाठी कुठले मशिनरी खरेदी केले, प्रॉफिटमधून आलेला त्यांचा हिस्सा त्यांना दिला नव्हता. वारंवार विचारणा करुनही अविनाश आणि केतकी विरकर हे दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. विविध कारण सांगून मालाची अद्याप डिलीव्हरी झाली नाही. संबंधित कंपन्यांना लवकरच डिलीव्हरी करुन त्यांच्याकडून मिळणारी प्रॉफिटची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगत होते. मात्र त्यांनी त्यांना पेमेंट केले नाही. त्यांनी दिलेले चारही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याच दरम्यान अविनाशने दिलेल्या काही कागदपत्रांची शहानिशा केली असता संबंधित कंपनी अस्तिस्तावात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अविनाश आणि त्यांची मुलगी केतकी विरकर यांच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने ९९ लाखांचा अपहार करुन तक्रारदार व्यावसायिकाची फसणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.