स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने बहिण-भावाला ७७ लाखांना चुना
सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दोन भामट्यांना अटक
अरुण सावरटकर
३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मालाड परिसरातील एका एसआरए प्रोजेक्टमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने एका बहिण-भावांची सुमारे ७७ लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या दोन वॉण्टेड भामट्यांना कुरार पोलिसांनी अटक केली. गणेश शिवप्रताप गुप्ता आणि अमीत धोंडू येलवे अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते, अखेर सात महिन्यानंतर या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या अटकेने फ्लॅट फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अनिल पांडुरंग मटकर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहत असून गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत चॅनेल पार्टनर आहेत. त्यांची मेघा प्रदीप रसाळ ही बहिण विलेपार्ले येथे राहत असून ती अधूनमधून त्यांच्या घरी येत होती. या दोघांनाही मालाड परिसरात प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे ते मालाड येथे स्वस्तात फ्लॅट मिळतो का याचा शोध घेत होते. याच दरम्यान मेघाचा मुलगा प्रणवला त्याचा एक जुना मित्र गणेश गुप्ता हा व्यायामशाळेत भेटला होता. चर्चेअंती त्याने त्याला फ्लॅटविषयी सांगितले होते. यावेळी गणेशने तो गणेश डेव्हलपर्स कंपनीत कामाला असून त्यांच्या इमारतीमध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांना स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून त्याने त्याचा विश्वास संपादन केला होता.
प्रदीपकडून ही माहिती मिळताच अनिल मटकर आणि मेघा रसाळ यांनी गणेशशी भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना त्यांची कंपनी एसआरए प्रोजेक्टमध्ये इमारतीचे बांधकाम करत असून त्यांच्याकडे अनेक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्याने त्यांची अमीत येवलेशी ओळख करुन दिली होती. त्याला मालाड येथील एसआरए प्रोजेक्टमध्ये चार फ्लॅट मिळणार असून त्यापैकी दोन फ्लॅट त्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी या दोघांनी त्यांची एसआरए आणि म्हाडामध्ये चांगली ओळख असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मालाडच्या कुरारगाव, आंबेवाडीतील एसआरए इमारतीमध्ये माऊली साई डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून दोन फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. फ्लॅटबाबत त्यांची गणेशच्या घरी मिटींग झाली होती.
काही दिवसांनी त्यांनी त्यांना सहाव्या मजल्यावर दोन फ्लॅट दाखविले होते. ते दोन्ही फ्लॅट अनिल मटकर आणि मेघा रसाळ यांना आवडले, त्यामुळे त्यांनी ते फ्लॅट विकत घेण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना टप्याटप्याने ७७ लाख ६७ हजार ५३४ रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात फेब्रुवारी २०२१ रोजी वांद्रे येथील एसआरए कार्यालयात एक करार झाला होता. काही दिवसांनी त्यांना ४०१ आणि ६०१ क्रमाकांच्या फ्लॅटचे वाटप पत्र देण्यात आले होते. या लेटरनंतर ते दोघेही त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले होते, यावेळी त्यांना तिथे दुसरेच व्यक्ती राहत असल्याचे समजले. चौकशीदरम्यान ते दोन्ही फ्लॅट त्यांच्या मालकीचे होते, या फ्लॅअशी अमीत येलवेशी काहीही संबंध नव्हता. या दोघांनी दोन्ही फ्लॅट त्यांच्या नावावर असल्याची बतावणी करुन संबंधित दोन्ही फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन अनिल मटकर व त्यांची बहिण मेघा रसाळ यांची सुमारे ७७ लाखांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांना जाब विचारुन फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी त्यांना पैसे दिले नाही किंवा फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून त्यांची फसवणुक करुन ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांनी गणेश गुप्ता आणि अमीत येलवे यांच्याविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून तक्रारदार भावासह त्याच्या बहिणीची ७७ लाख ६७ हजार ५३४ रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या गणेश गुप्ता आणि अमीत येवले या दोघांनाही शनिवारी १ ऑगस्टला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी फसवणुकीच्या उद्देशानेच तक्रारदारासह त्यांच्या बहिणीशी फ्लॅटचा व्यवहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांना अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फ्लॅटच्या आमिषाने फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.