९४ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपींना अटक

गुन्हा दाखल होताच दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – सुमारे ९४ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका मुख्य आरोपीसह दोघांना वनराई पोलिसांनी अटक केली. कमलेश साहू आणि विरेंद्र तन्वर अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. अखेर दोन वर्षांनी या दोघांनाही छत्तीसगढच्या रायपूर शहरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले होते. या गुन्ह्यांत रवी गुप्ता, अंकिता राय, प्रगती सिंह आणि देव शर्मा असे चौघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रशांत हरी शेट्टीकर हे मिरारोड येथे राहत असून गोरेगाव येथील उद्योग भवनमध्ये असलेल्या बॉक्स ऍण्ड फ्रिट लॉजिस्टिक सोल्यूशन कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. ही कंपनी केतन दिनेश मारु आणि चार्मी केतन मारु यांच्या मालकीची असून ते कंपनीत मुख्य संचालक तर निमिश कोटेचा हे मॅनेजिंग संचालक म्हणून करतात.ही कंपनी पार्ट लोड आणि फुल ट्रक लोड असे दोन सर्व्हिस देते. पार्ट लोडमध्ये वेगवेगळ्या पार्टीचे छोटे छोटे पार्सल एकत्र करुन दुसर्‍या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणे तसेच फुल ट्रकमध्ये एकाच पार्टीचे माल एका ठिकाणीाहून दुसर्‍या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करते.

त्यांच्या कंपनीने फुल ट्रकसाठी छत्तीसगढचे ग्रीन ऑईल कार्पोरेशनचे मालक कमलेश साहू, एम ट्रकी ट्रान्सपोर्टरचे रवी गुप्ता, फ्राका शिपिंग ऍण्ड लॉजिस्टिकचे मालक अंकिता राय, प्रगती सिंह, विरेंद्र तन्वर आणि देव शर्मा यांना कॉन्ट्रक्ट दिले होते. मात्र या तिन्ही कंपन्यांनी त्यांच्या मालाची वाहतूक न करता सर्व व्यवहार कागदावर दाखवून, बोगस ई-बिल तयार केले. रिसीव्हर कंपनीचे बोगस स्टॅम्प तयार करुन त्यांच्या कंपनीत सादर करुन सुमारे ९४ लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार ऑडिटदरम्यान उघडकीस येताच कंपनीच्या वतीने प्रशांत शेट्टीकर यांनी वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहापिशा केल्यानंतर कमलेश साहू, रवी गुप्ता, अंकिता राय, प्रगती सिंह, विरेंद्र तन्वर आणि देव शर्मा या सहाजणांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज तयार करुन कंपनीची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तपासात या संपूर्ण कटात कमलेश साहू याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला विरेंद्र तन्वर याने मदत केली होती.

मात्र गुन्हा दाखल होताच ते दोघेही सतत पोलिसांना गुंगारा देत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना ते दोघेही छत्तीसगढच्या रायपूर शहरात स्वतचे अस्तित्व बदलून वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे, पोलीस उपनिरीक्षक रंजीत वनवे, पोलीस हवालदार सतीश येवले, पोलीस शिपाई साजिद शेख आदीचे एक पथक छत्तीसगढला पाठविण्यात आले होते.

या पथकाने तांत्रिक माहितीवरुन कमलेश साहू आणि नंतर विरेंद्र तन्वर या दोघांना रायपूर शहरातून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत ते दोघेही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page