विक्रीसाठी घेतलेल्या चार कोटीचे हिरे घेऊन व्यापार्याचे पलायन
इतर हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या चार कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना वांद्रे, बीकेसी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्मित अल्पेशभाई शाह या हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. स्मितने भारत डायमंड बोर्समधील इतर काही हिरे व्यापार्याकडून हिरे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मृगेश हसमुख शहा हे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये असलेल्या स्टेलर जेम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. ही कंपनी डायमंड क्षेत्रात ट्रेडिंग, इंपोर्ट आणि एक्सपोर्टचे काम करते. त्यामुळे डायमंड क्षेत्रांशी संबंधित अनेक हिरे व्यापारी कंपनीशी त्यांचा थेट संबंध येतो. त्यापैकी शुम डायमंड कंपनीचे मालक राजेंद्र मोमया हे त्यांच्या परिचित हिरे व्यापारी आहेत. ते त्यांच्या कंपनीच्या संचालकांसोबत गेल्या वीस वर्षांपासून परिचित आहे तर त्यांचा त्यांच्या कंपनीसोबत चार वर्षांपासून व्यवहार करते. त्यांनीच त्यांची पार्श्वपद्य डायमंड फर्मसोबत त्यांची ओळख करुन दिली होती. या कंपनीचे मालक स्मित शाह हे आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कंपनी स्मित शाहसोबत हिर्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करत आहे. त्यांच्या मागणीनुसार कंपनीने त्यांना अनेकदा विक्रीसाठी हिरे दिले होते. या हिर्यांचे पेमेंट वेळेवर करुन त्यानेही कंपनीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही महिन्यांत कंपनीने स्मित शाहच्या कंपनीला टप्याटप्याने समारे चार कोटीचे ९८३ कॅरेटचे हिरे दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याच्या कंपनीकडून त्यांना पेमेंट मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून सतत पेमेंटबाबत पाठपुरावा सुरु होता. मात्र जून २०२६ महिना उलटूनही त्याच्याकडून त्यांना कोणाताही प्रतिसाद मिळाला नाही.
स्मित शाहने फसवणुकीच्या उद्देशाने बोगस कंपनी सुरु करुन त्यांच्या कंपनीशी हिर्यांचा व्यवहार सुरु केला. सुमारे चार कोटीचे हिरे घेतल्यानंतर तो पळून गेला होता. त्यांच्या कंपनीसह भारत डायमंड बोर्समधील अनेक हिरे व्यापार्याकडून स्मित शाहने विक्रीसाठी हिरे घेतले होते, मात्र कोणालाही परत केले नाही किंवा हिर्यांचे पेमेंट दिले नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने मृगेश शहा यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्मित शाह याच्याविरुद्ध विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे चार कोटीचा हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिासंकडून तपास सुरु आहे. फसवणुकीनंतर स्मित हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.