संचालकाच्या नावासह फोटो वापर करुन कंपनीला १.९८ कोटींचा गंडा

फसवणुकीची १.८३ कोटी रुपये फ्रिज करण्यात सायबर पोलिसांना यश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – कंपनीच्या संचालकाच्या नावासह फोटोचा वापर करुन अज्ञात सायबर ठगाने कंपनीला १ कोटी ९८ लाखांना गंडा घातला. याबाबत तक्रार प्राप्त होताच दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून ही रक्कम फ्रिज करण्याची विनंती केली. काही वेळात बँकेने संबंधित बँक खात्याचे सर्व व्यवहार थांबवून खात्यात जमा झालेली १ कोटी ८३ लाखांची रक्कम फ्रिज केली आहे. तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही तासांत सायबर सेल पोलिसांनी ९२ टक्के रक्कम परत मिळविण्यात यश मिळविले आहे. ही रक्कम लवकरच तक्रारदाराच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरिफ सलीम अन्सारी हे ४८ वर्षांचे तक्रारदार कुर्ला येथे राहत असून ग्रँटरोड येथील एका नामांकित कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम करतात. या कंपनीचे मालक-संचालक साल्हे मिठीबोरवाला असून त्यांनीच त्यांच्यावर कंपनीची आर्थिक जबाबदारी सोपविली होती. दिवसभरातील सर्व घडामोडी तसेच आर्थिक व्यवहारारची माहिती आरिफ अन्सारी हे साल्हे मिठीबोरवाला यांना देत होते. मंगळवारी ४ ऑगस्टला सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्या मोाबईलवर एक मॅसेज आला होता. या मॅसेजवर साल्हे मिठीबोरवाला यांच्या नावासह फोटो होता. त्यात त्यांनी तो त्यांचा नवीन मांबाईल क्रमांक आहे. आर्थिक व्यवहाराबाबत काही अपडेट असतील तर त्यांना याच मोबाईलवर पाठविण्यास सांगितले होते.

दुसर्‍या दिवशी त्यांना त्याच मोबाईलवरुन दुसरा एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात साल्हे मिठीबोरवाला यांनी त्यांना १ कोटी ९८ लाख रुपये राजपूत इंटरप्रायजेस या खाजगी कंपनीच्या बँक खात्यात तातडीने पाठविण्यास सांगितले होते. हा मॅसेज त्यांनीच पाठविल्याचा समज करुन त्यांनी दिलेल्या बँक खात्यात १ कोटी ९८ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्यांना साल्हे मिठीबोरवाला यांनी कॉल करुन पैसे डेबीट झाल्याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याच मॅसेजनंतर ही रक्कम संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांना असा कुठलाही मॅसेज पाठविला नव्हता, कुठल्याही कंपनीची बँक खाते पाठवून त्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचा सल्ला दिला नाही असे सांगितले.

त्यांना अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या संचालकाच्या नावाने बोगस मॅसेज पाठवून त्यांना राजपूत इंटरप्रायजेस या कंपनीच्या बँक खात्यात १ कोटी ९८ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे समजले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागातील सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्राीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक इशान खरोटे, पूनम जाधव, पोलीस हवालदार किरण पाटील, महिला पोलीस शिपाई सारिका शेगर यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच बँक खात्यात ट्रान्स्फर झालेली रक्कम फ्रिज करण्याची विनंती केली होती. या विनंती बँकेने तातडीने खात्यात जमा झालेली १ कोटी ८३ लाख ३ हजार ४९२ रुपये फ्रिज केले आहे. उर्वरित रक्कम सायबर ठगांनी दुसर्‍या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले आहे. तक्रार प्राप्त होताच ९२ टक्के परत मिळविण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या खात्याची माहिती काढली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page