सायबर फसवणुकीसाठी म्युल अकाऊंट पुरविणार्या टोळीचा पर्दाफाश
२२ बँक खात्यात फसवणुकीची साडेसात कोटी जमा झाल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – ऑनलाईन टास्क फसवणुकीसाठी सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरविणार्या एका टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत टोळीच्या एका प्रमुख आरोपीस पोलिसांनी अटक केली. अविनाश बाळसाहेब खरात असे या आरोपीचे नाव असून त्याच्यासह त्याचा मित्र विकास गजानन भुजबळ यांनी वेगवेगळ्या बँकेत २२ खाती उघडून ती माहिती सायबर ठगांना दिली होती. या बँक खात्यात आतापर्यंत फसवणुकीची साडेसात कोटीची रक्कम जमा झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अविनाश हा पोलीस कोठडीत असून त्याच्या दुसरा सहकारी विकास याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ही टोळी सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवत असून त्यातून त्यांना लाखो रुपये कमिशन म्हणून प्राप्त झाल्याचे निष्पन झाले आहे.
यातील तक्रारदार खार परिसरात राहत असून त्यांना टेलिग्रामद्वारे संपर्क साधून अज्ञात सायबर ठगांनी ऑनलाईन टास्कचा पार्टटाईम जॉंबची ऑफर दिली होती. सुरुवातील फ्रि टास्क दिल्यानंतर या ठगांनी त्यांना पेड टास्क दिले होते. पेड टास्कच्या माध्यमातून त्यांना जास्त कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ४ लाख ७ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. मात्र कुठलेही कमिशन तसेच मूळ रक्कम न देता त्यांची संबंधित सायबर ठगांनी फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता.
ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर काही संशयित आरोपींची नावे समोर आली होती. त्यात अविनाश खरात आणि विकास भुजबळ यांचा समावेश होता. त्यामुळे या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दिपाली मरळे, पोलीस उपनिरीक्षक् विजय सैद, गोविंद बेडके, पोलीस हवालदार नागेश पाटील, पोलीस शिपाई रुपाली मोटे आणि गणेश लोटे यांनी अविनाश खरात याला ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांचा त्याचा सहभाग उघडकीस आला होता.
अविनाशसह त्याचा मित्र विकास यांनी सायबर ठगांना फसवणुकीसाठी म्युल अकाऊंट पुरविल्याची कबुली दिली. त्यांनी आतापर्यंत स्वतसह वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने विविध बँकेत २२ खाते उघडले होते. त्यापैकी तेरा बँक खाती अविनाश तर नऊ बँक खाती विकासने उघडून दिले होते. या खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्यानंतर त्यात देशभरातील वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील ७ कोटी ४२ लाख २८ हजार ४०९ रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले. याबाबत पोलिसांना एकूण ४२ फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाले आहेत. याच बँक खात्यात इतर गुन्ह्यांचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरविणारी ही सराईत टोळी असून या टोळीतील इतर सदस्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.