मध्यप्रदेशातून आलेल्या सोळा वर्षाला मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात
शाळेत जातो असे सांगून मालिकेत काम करण्यासाठी आला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मध्यप्रदेशातून मुंबई शहरात आलेल्या एका सोळा वर्षांच्या मुलाला आरे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. शाळेत जातो असे सांगून हा मुलगा तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत काम करण्यासाठी मुंबईत आल्याची माहिती समोर आली आहे. त्याची माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली असून त्याला घेण्यासाठी त्याचे पालक मध्यप्रदेशातून मुंबईत येण्यासाठी निघाल्याचे पोलिसांनी सांगितले. मिसिंग मुलगा सुखरुप मुंबईत सापडल्याने त्याच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात एक अल्पवयीन मुलगा फिरत असल्याची माहिती उत्तर नियंत्रण कक्षातून आरे पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर आरे पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे जाऊन संशयास्पद फिरणार्या या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने त्याचे नाव पारस असल्याचे सांगितले. तो मध्यप्रदेशच्या छिंदवाडा, हिवरखेडी ब्लॉक चौराईचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले.
चौकशीत तो तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकांचा प्रचंड चाहता होता. त्याला या मालिकेत काम करायचे होते, मात्र घरातील त्याला मुंबईत कामासाठी पाठविणार नाही याची खात्री झाल्याने त्याने स्वतहून मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी ६ ऑगस्टला तो घरातून शाळेत जातो असे सांगून निघाला. दुपारी दोन वाजता तो छिंदवाडा रेल्वे स्थानकातून सुपरफास्ट ट्रेन पकडून सायंकाळी सहा वाजता नागपूर रेल्वे स्थानकात आला. त्यानंतर त्याने सातची मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडली. ७ ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजता तो मुंबईत आला आणि तेथून थेट गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये आला होता.
परिसरात संशयास्पद फिरताना एका दक्ष नागरिकाने पाहिले आणि त्याची माहिती उत्तर नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला. त्याची माहिती त्याच्या वडिलांना कळविण्यात आली असून ते त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबईला निघाले आहेत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे.