शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – शाळा सुटल्यानंतर एका अल्पवयीन शाळकरी मुलीला बाईकवरुन एका निर्जनस्थळी आणून तिच्यावर तिच्याच परिचित अल्पवयीन मुलाने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. यावेळी आरोपीने तिचे दोन्ही हातपाय बांधून तिचे काही अश्लील फोटोसह व्हिडीओ काढले होते. संबंधित फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी अल्पवयीन मुलाला माहीम पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले आहे. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत अन्य एका आरोपीचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पिडीत मुलगी तिच्या पालकांसोबत माहीम परिसरात राहत असून एका नामांकित शाळेत शिकते. १८ जूनला ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती तिच्या घरी जात होती. यावेळी तिथे आरोपी बाईकवर आला होता. त्याने तिला बाईकवरुन एका निर्जनस्थळी आणून तिचे हायतपाय बांधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी त्याने तिचे काही अश्लील फोटोसह व्हिडीओ बनविले होते. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
दुसरीकडे या घटनेनंतर ती प्रचंड मानसिक तणावात होती. हा प्रकार तिच्या पालकाच्या निदर्शनास आला होता, त्यांनी तिची आपुलकीने चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी माहीम पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी हादेखील अल्पवयीन असल्याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.
या गुन्ह्यांत अन्य एका तरुणाचा सहभाग उघडकीस आला असून त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे बोलले जाते. पिडीत मुलीसह आरोपीला लवकरच मेडीकलसाठी पाठविले ाजणार आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.