सुरक्षारक्षकाच्या हत्येचा पर्दाफाश करुन पाच आरोपींना अटक
तिहेरी हत्या करुन लुटमारीचा प्रयत्न फसल्याने सुरक्षारक्षकाला संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – विलेपार्ले येथे मनोजकुमार अयोध्या यादव या ३५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाची हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर जुहू पोलिसांना यश आले आहे. या कटातील मुख्य आरोपीसह पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. जोगेश्वर उदन मल्लिक ऊर्फ किशन, विजय गोंजारे, शरद येरुडकर, महादेव येरुडकर आणि अनिकेत बोरनाक अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील मुख्य सूत्रधार जोगेश्वर असून त्याला त्याच्या व्यापारी मालकासह त्याची पत्नी आणि मुलीची हत्या करुन घरात लुटमार करायचे होते, मात्र लुटमारीचा प्रयत्न फसल्याने त्याने साक्षीदार असलेल्या मनोजकुमार यादव याला संपवून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना शनिवारी बारा ते रविवारी पहाटे पाचच्या दरम्यान विलेपार्ले येथील व्ही. एम रोड, अभिजीत इमारतीमध्ये घडली. याच इमारतीमध्ये मनोजकुमार हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री उशिरा त्याची अज्ञात व्यक्तीने गळा आवळून हत्या केली होती. त्याचे हातपाय कापडी दोरीने बांधून त्याचा मृतदेह इमारतीमधील तळ मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार पहाटे पाच वाजता उघडकीस येताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचा मृतदेह नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. त्यात त्याची हत्या करुन नंतर हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर जुहू पोलिसांनी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला होता.
याच गुन्ह्यांतील इमारतीमधील काही रहिवाशी, त्यांचे नोकर, सुरक्षारक्षकांची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान जोगेश्वर मल्लिक हा याच सोसायटीमध्ये राहणार्या एका व्यापार्याच्या घरी आचारी म्हणून काम करत होता. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच ही हत्या केल्याची कबुली दिली. एकाच ठिकाणी काम करत असल्याने जोगेश्वर आणि मनोजकुमार हे एकमेकांच्या परिचित होते. जोगेश्वरला त्याच्या मालकाच्या घरी चोरी करायची होती, त्यासाठी त्याने एक योजना बनविली होती. योजनेनुसार त्याने व्यापार्याच्या फ्लॅटची बोगस चावी बनविली होती. या कटात त्याने मनोजकुमारसह इतर चार सहकार्यांची मदत घेतली होती. व्यापारी मालकासह त्याची पत्नी आणि मुलीची हत्या करुन ते घरातील सर्व मुद्देमाल चोरी करुन पळून जाणार होते.
ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शनिवारी रात्री एकत्र भेटले. त्यांनी मद्यप्राशन केले, त्यानंतर जोगेश्वर हा त्याच्या सहकार्यासोबत मालकाच्या फ्लॅटजवळ आला होता. मात्र बोगस चावीने दरवाजा न उघडल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला गेला होता. हा प्रकार मनोजकुमारमुळे उघड होऊ शकतो. या कटात तो मुख्य साक्षीदार असल्याने त्यांनी त्याला संपविण्याचा निर्णय घेतला होता. चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी मनोजकुमारचे हातपाय बांधून त्याची गळा आवळून हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून तेथून पलायन केले होते. मात्र जोगेश्वरच्या अटकेनंतर या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
जोगेश्वरला ताब्यात घेतल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद गावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल माळी, संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील, यश पालवे, हनुमंत कुंभार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब पोटे, सूर्यकांत ओमासे व अन्य पोलीस पथकाने विजय गोंजारे, शरद येरुडकर, महादेव येरुडकर, अनिकेत बोरनाक या चौघांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
जोगेश्वर हा कटातील मुख्य सूत्रधार असून गेल्या दोन वर्षांपासून तो या कटाची आखणी करत होता. त्यासाठी त्याने टप्याटप्याने इतर सहकार्यांना सामिल करुन घेतले होते. व्यापार्याच्या घरातील कॅश, सोन्याचे दागिने चोरी केल्यानंतर प्रत्येकाला हिस्सा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचा तिहेरी हत्येसह चोरीचा प्रयत्न फसला गेला आणि त्याने साक्षीदार असलेल्या मनोजकुमारला संपवून पलायन केले होते. गुन्हा दाखल होताच अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या हत्येच्या कटाचा पर्दाफाश करुन पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.