बोगस एपीके फाईल एअर इंडियाच्या निवृत्त अधिकार्याची फसवणुक
फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत करणार्या दुकलीीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२६
मुंबई, – एअर इंडियामधून निवृत्त झालेल्या एका ६८ वर्षांच्या वयोवृद्धाला महानगर गॅस लिमिटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन गॅस पेमेंटसह बँक खाते अपडेट करण्यास प्रवृत्त करुन एपीके फाईलद्वारे सुमारे दहा लाखांना ऑनलाईन गंडा घालणार्या एका दुकलीस दहिसर पोलिसांनी अटक केली. आर्यन राजेंद्र गुप्ता आणि अंकित संजय तिवारी अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खात्याची डिटेल्स देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या बँक खात्यात फसवणुकीची सुमारे साडेपाच लाखांची कॅश जमा झाली होती. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
६८ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार शुकेंद्र शंकरराव होलकर हे बोरिवलीतील श्रीकृष्णनगरात राहत असून ते एअर इंडियामध्ये कामाला होते. २०१७ साली ते निवृत्त झाले असून सध्या घरी राहतात. २५ जुलैला त्यांना विनय शर्मा नाव सांगणार्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो महानगर गॅस लिमिटेडमधून बोलत असून त्यांचे गॅसचे पेमेंट पेडिंग आहे. त्यामुळे तुमची गॅस लाईन ब्लॉक होणार आहे. त्यांनी गॅस बिल भरल्याचे सांगूनही त्याने ते बिल त्यांच्या पोर्टलवर दिसत नसल्याचे सांगितले. बिल भरण्यासह बँक अकाऊंट अपडेटच्या नावाने त्याने त्यांना एपीके फाईल पाठवून तेरा रुपये भरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी ती फाईल ओपन करुन त्यांची वैयक्तिक तसेच बँक खात्याची माहिती भरली होती. या माहितीनंतर त्यांनी तेरा रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून पेमेंट होऊ शकले नाही.
काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर बँकेचे काही मॅसेज आले होते. या मॅसेजची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यातून सुमारे दहा लाख रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. गॅस लाईन ब्लॉकची धमकी देऊन अज्ञात व्यक्तीने महानगर गॅस लिमिटेडची बोगस एपीके फाईल पाठवून ही फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आर्यन गुप्ता आणि संजय तिवारी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात आर्यन हा जोगेश्वरी तर अंकित वसई परिसरात राहतो. त्यांच्याच बॅक खात्यात फसवणुकीची अनुक्रमे ३ लाख ४९ हजार ८५६ तर २ लाख रुपये ट्रान्स्फर झाली होती.
या रक्कमेची दोन्ही आरोपींनी विल्हेवाट लावली होती. ते दोघेही बोगस एपीके फाईल पाठवून फसवणुक करणार्या काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. या सायबर ठगांना फसवणुकीसाठी त्यांनी बँक खात्याची डिटेल्स पुरविली होती. याकामी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, एपीआय संदीप पांचागणे, पोलीस उपनिरीक्षक आकाश पापटील, श्रुती मालपोटे, पोलीस हवालदार कल्पेश सुर्वे, पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे, नितीन पाटील, महिला पोलीस शिपाई सोनल मस्के या पथकाने केली.