एलएलबीच्या तरुणाची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या
मैत्रिणीसह बहिणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – एलएलबीच्या एका २४ वर्षांच्या तरुणाने त्याच्या निवासी इमारतीच्या तेराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. सनथ विजय राघवन असे या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रिण सुनिधी आणि तिची बहिण परिधी यांच्याविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही बहिणींची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास वांद्रे येथील झेन गार्डन, एम विंगमध्ये घडली. या विंगच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १३०१ मध्ये पूजा विजय राघवन ही महिला तिच्या कुटुबियांसोबत राहत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सनथ हा तिचा मोठा मुलगा असून तचे एलएलबीचे शिक्षण चेंबूरच्या स्वामी विवेकानंद कॉलेजमधून झाले होते. सध्या तो मुंबई उच्चव न्यायालयातील एका न्यायमूर्तीकडे क्लार्क म्हणून काम करत होता. मार्च २०२६ त्याचे घरातूनच काम सुरु होते. याच दरम्यान तो मानसिक तणावात असल्याचे पूजा राघवन हिच्या लक्षात आले होते.६ ऑगस्टला सनथच्या एका मित्राकडून तिला त्याचे बंगलोर येथे राहणार्या सुनिधी नावाच्या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. मात्र काही दिवसांपासून सुनिधी त्याच्यावर पोलीस ठाण्यात केस करणार असल्याची धमकी देत होती. त्यामुळे सनथ हा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात असल्याचे सांगितले होते.
त्याच दिवशी तिला त्याच्या दोन मित्रांनी पुन्हा कॉल करुन सुनिधी आणि तिची बहिण परिंधी या त्याच्यावर पोलीस ठाण्यात केस दाखल करण्याची धमकी देत असल्याची माहिती दिली होती. याच दरम्यान तिच्या लहान मुलाच्या मोबाईलवर एक मिस कॉल आला होता. यावेळी तिने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरील व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. या मोबाईलवरुन तिला एक कोण आहे असा मॅसेज प्राप्त होताच तिने सनथची आई पूजा राघवन असल्याचे रिप्लाय केला होता. यावेळी तिला समोरील व्यक्तीने सनथवर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले. चौकशीअंती तो मोबाईल क्रमांक परिधींचा होता. या घटनेनंतर तिने सनथकडे विचारणा केली होती. त्याने सुनिधी आणि परिधी या त्याला ब्लॅकमेल करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्याने तिला त्याच्या एका मित्राचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यानतर सनथ हा त्याच्या बेडरुममध्ये निघून गेला. त्याने आतून स्वतला लॉक लावून कोंडून घेतले होते. दुपारी पावणेदोन वाजता पूजाला त्याच्या एका मित्राचा कॉल आला होता. त्याने सनथ हा सुनिधी आणि परिधी यांच्याकडून सुरु असलेल्या मानसिक शोषणाला कंटाळून गेला असून तो आत्महत्या करत आहे असे सांगितले. त्यानंतर तिने बेडरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र सनथने आतून कडी लावल्याने तिला दरवाजा उघडता आला नाही. याच दरम्यान सनथने इमारतीच्या गॅलरीतून उडी घेतली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. तयमुळे त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी पूजा राघवन हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून तिने सुनिधी आणि परिधी या दोन बहिणीविरुद्ध सनथचा मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. तसेच या दोघींवर कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनंतर या दोन्ही बहिणीविरुद्ध पोलिसांनी सनथला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. याच गुन्ह्यांत सुनिधी आणि परिधीं यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे.