सांताक्रुज येथे सिनेअभिनेत्रीच्या घरी झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश
७६ लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह मुख्य आरोपीस बिहारहून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – जुलै महिन्यांत सांताक्रुज येथे राहणार्या बिग बॉसफेम सिनेअभिनेत्री लोपामुद्रा राऊत हिच्या घरी झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात सांताकुज पोलिसांना यश आला आहे. याप्रकरणी चंदन कमलेश मुखिया या २६ वर्षांच्या मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ७६ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीच्या पैशांतून त्याने बहिणीच्या नावाने जमिन खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून चोरीचा उरर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोपामुद्रा राऊत ही सिनेअभिनेत्री असून तिने बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. ती सध्या सांताक्रुज येथील जुहू-तारा रोडवरील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहते. २० जून ते २७ जुलै २०२६ या कालावधीत ती बाहेरगावी होती, तिच्या घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. कपाटातील कॅश, विविध सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्कीट आणि इतर महागड्या वस्तू असा ५४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
२७ जुलैला लोपामुद्रा राऊत ही तिच्या घरी आली असता तिला चोरीचा हा प्रकार दिसून आला होात. त्यानंतर तिने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत सांताक्रुज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन आरोपींचा शोध सुरु केला होता. यातील एका फुटेजमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चंदन मुखिया हा दिसून आला होता. त्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस येताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
यावेळी चंदन हा त्याच्या बिहार येथील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहीतकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद गावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर, पोलीस निरीक्षक सखाराम मोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कल्हाटकर, दिनकर दराडे, पोलीस उपनिरीक्षक उमेश कौलगे, सहाय्यक फौजदार जयवंत मोरे, पोलीस हवालदार कर्ले, सुखदरे, पोलीस शिपाई हिरेमठ, चिला, माने, दिवाणजी, गोयल, वाळकोळी, कुरारे आदींचे एक पथक बिहारला पाठविले होते.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने चंदनला चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चंदनने चोरीच्या पैशांतून बिहारमध्ये त्यांच्या बहिणीच्या नावाने एक जमिन खरेदी केली होती. ही जमिन खरेदी केल्यानंतर तिच्या बहिणीच्या नावावर करण्यासाठी त्याने कैलास साह याला काही रक्कम दिली होती. ही रक्कम त्याने त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. ४६ लाख ३९ हजाराची ही रक्कम त्यांच्या खात्यात फ्रिज करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत कैलास साह याची चौकशी करुन त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.
या रक्कमेसह २५ लाखांची २०० ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड, पाच लाखांची एक रोलेक्स कंपनीचे घड्याळ असा ७६ हजार ३९ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर चंदनला तैथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ८ ऑगस्टपर्यंत ट्रान्झिंट रिमांड दिले होते. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.