मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – सुमारे दोन कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह एका प्रवाशाला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. अभिषेक आकाशभाई टेलर असे या प्रवाशाचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या सुरतचा रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी ६६०५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत बँकॉंकहून हायड्रोपोनिक गांजा तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे बँकॉंकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांची विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने कसून तपासणी सुरु केली होती. ही मोहीम सुरु असताना बँकॉंकहून येणार्या विमानातून कोट्यवधी रुपयांच्या हायड्रपोनिक गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बँकॉंक येथून आलेल्या प्रत्येक संशयित प्रवाशांची चौकशी करुन त्यांच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली होती. मध्यरात्री तीन वाजता अरायवल हॉलजवळ या अधिकार्यांनी अभिषेक टेलरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना आठ ट्रिपल लेअर व्हॅक्यूम पॅकेट सापडले. या पॅकेटमधून या अधिकार्यांनी ६६०५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोन कोटी पाच लाख रुपये इतकी किंमत आहे. अभिषेक हा गुजरातच्या सुरतचा रहिवाशी असून काही दिवसांपूर्वीच तो बँकॉंकला गेला होता. बँकॉकहून मुंबईत येत असताना त्याला हायड्रोपोनिक गांजाचे पॅकेट एका व्यक्तीने दिले होते.
त्यासाठी त्याला विमानाने तिकिट आणि काही कमिशनचे देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर रविवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.