मालकाचा डिपी असलेला मॅसेज पाठवून ३० लाखांची फसवणुक
कंपनीच्या अकाऊंटटच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२६
मुंबई, – मालकाचा डिपी असलेला मॅसेज पाठवून एका खाजगी कंपनीच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर ठगांनी सुमारे तीस लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या अकाऊंटटच्या तक्रार अर्जावरुन उत्तर प्रादेशिक विभागाच्या अधिकार्यांनी अज्ञात सायबर ठगांविरुद्ध फयवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी सायबर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
इक्बाल अब्दुल रेहमान शेख हे मालाड येथे राहत असून गोरेगाव येथील नारायण प्लाझा, राममंदिर घासवाला इस्टेटमध्ये असलेल्या लाईट ऍण्ड लाईट कंपनीत गेल्या पंधरा वर्षांपासून अकाऊंट म्हणून काम करतात. २७ ऑगस्टला दुपारी दिड वाजता त्यांना एका अज्ञात मोबाईलवरुन व्हॉटअप मॅसेज आला होता. या मोबाईलचा डिपी त्यांचे मालक नासीरभाई यांच्यासारखा होता. त्यांना तो मोबाईल क्रमांक नासीरभाई यांचा नवीन क्रमांक असावा असे समजून त्यांनी सेव्ह केला होता. काही वेळानंतर या मोबाईलवरुन त्यांना एका बँक खात्यातून तीस लाख रुपये तातडीने पाठविण्यास सांगण्यात आले होते.
यावेळी त्यांनी कुठल्या बँक खात्यातून पैसे पाठवायचे आहे अशी विचारणा केली होती, यावेळी समोरील व्यक्तीने कंपनीच्या बँक खात्यातून पैसे पाठविण्यास सांगितले. त्यांनी नासीरभाई यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी रिप्लाय दिला नाही. मिटींगमध्ये असल्याचे सांगून त्यांना मॅसेज करण्यास सांगितले. यावेळी त्याने बॉसला लोन द्यायचा आहे असे सांगून तीस लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या बँक खात्यात त्यांनी दिलेल्या बँक खात्यात तीस लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एक मॅसेज आला होता. त्यात त्यांनी त्यांना पुन्हा एक कोटी रुपये पाठविण्यास सांगितले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कंपनीच्या सीएला ही माहिती दिली. त्याने नासीरभाई यांना कॉल करुन एक कोटीविषयी विचारणा केली होती, यावेळी त्यांनी कोणालाही एक कोटी रुपये पाठविण्यास सांगितले नाही. या प्रकारानंतर इक्बाल शेख यांना धक्काच बसला होता. हा प्रकार त्यांनी कंपनीचे ऍडमीन विभागातील सोहेल सोलंकी यांना सांगितली. त्यानंतर त्यांनीद सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक विभागात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात फसवणुकीची तीस लाखांची रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्यात येत आहे. या आरोपींवर लवकरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.