खर्चाला पेसे दिले नाही म्हणून पित्यावर डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी मुलाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२६
मुंबई, – खर्चाला पैसे दिले नाही म्हणून कुमार राजू देवेंद्र या ४७ वर्षांच्या पित्याच्या डोक्यात त्याच्याच मुलाने लोखंडी रॉडने प्राघातक हल्ला केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात कुमार यांच्या डोक्याला आठ टाके लागून असून त्यांच्यावर कूपर हॉस्पिटलमधश्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरज कुमार देवेंद्र या २२ वर्षांच्या आरोपी मुलाला जुहू पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना सोमवारी १ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता विलेपार्ले येथील नेहरुनगर, महात्मा गांधी चाळीत घडली. याच चाळीत कुमार देवेंद्र हे राहत असून ते सेव्हन स्टारमध्ये केबल ऑपरेटर म्हणून कामाला आहे. त्यांना सतीश, सुरज आणि शंकर नावाचे तीन मुले असून त्यापैकी सुरज आणि सतीशचे लग्न झाले आहे. ते त्यांच्या पत्नीसोबत त्याच परिसरात राहतात. सुरजला नशा करण्याचे व्यसन असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत. काहीच कामधंदा करत नसल्याने तो काही दिवसांपासून त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. मात्र ते त्याला पैसे देत नव्हते. आधी काम कर आणि पैसे कमव असे ते त्याला सांगत होते. याच कारणावरुन त्यांच्यात वाद होता. त्याला काम करायचे नव्हते, त्यामुळे तो त्यांना घर विक्री करण्यास सांगत होता. पैशांसाठी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. मात्र ते त्याच्या धमक्यांना भीक घालत नव्हते.
सोमवारी १ सप्टेंबरला सकाळी सुरज हा त्यांच्या घरी आला आणि त्याने खर्चासाठी पुन्हा पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात कपाटासह पर्समध्ये पैसे शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्याला तसे करु नकोस असे सांगितले. त्याने त्यांना पैसे दिले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर कुमार देवेंद्र यांनी त्याच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सुरजला पोलिसांनी समज देऊन सोडून दिले. त्याची पोलिसांत तक्रार केली म्हणून तो पुन्हा त्यांच्या घरी आला आणि त्याने कुमार देवेंद्र यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.
भीतीपोटी त्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली नाही. सायंकाळी सहा वाजता तो पुन्हा लोखंडी रॉड घेऊन घरी आला. मुलगा असूनही माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करतो, आता मला पैसे नको, तुझा जीव घेतो असे बोलून त्याने कुमार देवेंद्र यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने तीन ते चार वेळा हल्ला केला होता. त्यात कुमार हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. अचानक झालेल्या आरडाओरडानंतर स्थानिक रहिेवाशांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी स्थानिक रहिवाशांना धमकावून सुरज तेथून पळून गेला होता.
रक्तबंबाळ झालेल्या कुमारला लोकांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. ही माहिती प्राप्त होताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुरजविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरजला पोलिसांनी काही तासांत अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.