चोरीच्या ऍपल मोबाईल खरेदी करणार्‍या टोळीचा टोळी पर्दाफाश

आयडी रिमूव्ह करुन इतर राज्यासह विदेशात मोबाईलची विक्री करायचे

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – चोरीच्या ऍपल मोबाईल खरेदी करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शाहनवाज नफिज खान, विक्रम सुजाजी माली, बिलाल रज्जतअली नागोरी आणि अल्तमेश इम्तियाज खान अशी या चौघांची नावे आहेत. ही टोळी ऍपल आयडी रिमूव्ह करुन खरेदी केलेल्या मोबाईलसह मोबाईल पार्टस वेगवेगळे करुन इतर राज्यासह विदेशात विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ६४ ऍपल मोबाईल तसेच वीस चोरीच्या मोबाईलचे वेगवेगळे केलेले मिडल बॉडी, डिस्प्ले, बॅटरी, मदरबोर्ड, लॉजिक बोर्ड आदी ४४ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यातील तक्रारदाराचा मे २०२६ रोजी ऍपल कंपनीचा एक मोबाईल चोरीस गेला होता. या चोरीची तक्रार त्यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना चोरीच्या मोबाईलमध्ये एका सिमकार्डचा वापर होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मोबाईलमध्ये सिमकार्ड वापरणार्‍या आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी २१ ऍपल मोबाईल आणि बारा सिमकार्ड जप्त केले होते.

चौकशीत ही टोळी चोरीचे ऍपल मोबाईल खरेदी करुन ऍपल आयडी रिमूव्ह करुन अशा मोबाईलची इतर राज्यासह विदेशात विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. या टोळीने काही चोरीच्या मोबाईलचे वेगवेगळे पार्टस काढून त्याचीही कमी किंमतीत विक्री केली होती. आरोपीच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्या तीन सहकार्‍यांना ताब्यात घेतले होते. या चारही आरोपींना नंतर चोरीच्या मोबाईलची खरेदी करणे, ऍपल आयडी रिमूव्ह करुन अशा मोबाईलसह मोबाईलच्या पार्टसची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तपासात अशा प्रकारे चोरीचे ऍपल मोबाईल चोरी करुन त्याचे आयडी रिमूव्ह करुन विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ६४ ऍपल कंपनीचे मोबाईल, वीस चोरीच्या मोबाईलचे विविध पार्टस असा ४४ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यापैकी तेलंगणा अकरा, दिल्ली तीन, महाराष्ट्र-मुंबई एकोणीस, कर्नाटक दोन, राजस्थान, तामिळनाडू मधील प्रत्येक एक मोबाईलचा समावेश आहे.

ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश बागुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मुळे, पोलीस निरीक्षक फरीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार वंजारी, जालिंद्र लेंभे, पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे, अमोल चौरे, पोलीस हवालदार प्रशांत चव्हाण, किरण घाग, प्रविण पवार, प्रकाश वाघ, पोलीस शिपाई भागवत पाखरे, सागर हेमाडे, समीर साळवे, विरेश कोराळे आदी पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page