दिल्लीतील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप करुन फसवणुक

६.३१ कोटीच्या फसवणुकप्रकरणी सायबर ठगांना मदत करणार्‍या तरुणाला अटक

0

अरुण सावरटकर
१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दिल्लीतील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे सांगून मोबाईलचा वापर करण्यासाठी अडीच कोटीचे कमिशन घेतल्याचा आरोप करुन एका वयोवृद्ध आर्किटेक्टची ६ कोटी ३१ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी रितिक सुरेश नट नावाच्या एका २४ वर्षांच्या आरोपी तरुणाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. रितिकवर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याकामी त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

६१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मोहम्मद इक्बाल अन्सारी हे आर्किटेक्ट असून बोरिवलीतील नॅशनल पार्कजवळील अभिनव नगरात राहतात. २६ जुलैला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना अविनाश श्रवण टेकम नाव सांगणार्‍या व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने त्यांच्या नावासह आधारकार्डची माहिती सांगून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे तुम्ही कोण आहात, माझी तसेच माझ्या कुटुंबियांची चौकशी का करतात अशी विचारणा केली होती. त्यानंतर त्यांना दुसर्‍या क्रमाकांवरुन दुसर्‍या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. त्याने तो राजेशकुमार सिंग असल्याचे सांगून सध्या लखनऊ पोलीस दलात कामाला असल्याचे सांगितले. त्याने पोलीस युनिफॉर्म घातला होता. दिल्लीतील बॉम्बस्फोटात तुमच्या मोबाईल क्रमांकाचा वापर आला असून त्यात तुम्ही अडीच कोटीचे कमिशन घेतले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत तुमचा सहभाग उघडकीस आला असून तुमच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होणार आहे. त्याचीच ही चौकशी सुरु असून हा अजामिनपात्र गुन्हा आहे.

काही वेळानंतर त्याने त्यांच्या बँक खात्यासह गुंतवणुकीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी तीन कोटींची गुंतवणुक केली असून काही रक्कम म्युच्युअल फंडामध्ये भरले आहेत असे सांगितले. यावेळी त्याने त्यांची सर्व रक्कम एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यासाठी त्याने त्यांना एक लेटर पाठविले होते. या लेटरमध्ये कुठल्या बँक खात्यात ही रक्कम पाठवायची आहे याचा शिक्का आणि राज्यपाल पूनम गुप्ता यांची सही होती. चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला नाहीतर त्यांना त्यांची सर्व रक्कम परत मिळेल असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईड लाईननुसार वयोवृद्धांना तातडीने अटक करता येत नाही. मात्र तुम्ही चौकशी सुरु असेपर्यंत डिजीटल अरेस्ट असणार आहे. तुमच्या घराबाहेर सात ते आठ पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न करु नका. चौकशीबाबत कोणाशी चर्चा करु नका, याबाबत कोणालाही काहीही सांगू नका.

तपासात सहकार्य केल्यास आम्हीही तुम्हाला मदत करु. मात्र नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई होईल अशी धमकी दिली होती.दुसर्‍या दिवशी त्यांना अन्य एका व्यक्तीने कॉल करुन तो एटीएस प्रमुख असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यासह गुंतवणुकीची सर्व माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी, वॉरंट कॅन्सल करण्यासाठी मदत करा असे सांगून त्यांना त्यांच्याकडील रक्कम काही बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा सल्ला दिला होता. या प्रकारामुळे मोहम्मद इक्बाल हे प्रचंड घाबरले होते. दिल्ली बॉम्बस्फोट, त्यात त्यांना कमिशन म्हणून मिळालेले अडीच कोटी, त्यांचा अतिरेक्यांशी असलेला कथित संबंधाच्या आरोपामुळे त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात सहा कोटी एकतीस लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.

ही रक्कम ट्रान्स्फर झाल्यानंतर त्यांनी त्यांची चौकशी अचानक बंद केली होती. कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लागत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ऑनलाईन सायबर पोर्टलसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमेाहीम सुरु असताना पोलिसांनी ज्या ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या सर्व बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता.

त्यातील काही रक्कम रितीक नट या आरोपीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती, त्यामुळे रितीकला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाते पुरविल्याची कबुली दिली. बँक खातयत जमा झालेली रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आल्याचे सांगितले. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page