शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणारा बॅक मॅनेजर गजाआड

७६.५० लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप

0

अरुण सावरटकर
७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने एका वयोवृद्ध महिेलेला ७६ लाख ५० हजारांना गंडा घालणार्‍या वॉण्टेड बॅक मॅनेजरला अखेर सहा महिन्यानंतर एमएचबी पोलिसांनी अटक केली. जय मुकेश मेहता असे या आरोपी मॅनेजरचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्यासह त्याची पत्नी सुनिता मेहता, वडिल मुकेश मेहता, आई आणि भावाचा सहभाग असून या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या सर्वांनी कट रचून वयोवृद्ध महिलेचा विश्‍वास संपादन करुन शेअरसाठी घेतलेली रक्कम गुंतवणुक न करता स्वतच्या वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्स्फर ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

८५ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला नसिमा शरीफ निजाम बोरिवलीतील न्यू लिंक रोड, आयसी कॉलनीत राहते. २००७ साली तिच्या पतीचे कॅन्सर या आजाराने निधन झाले होते. तिला आमीर नावाचा मुलगा असून तो त्याच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत वांद्रे येथे राहतो. तो अधूनमधून तिला भेटण्यासाठी येतो. २०१८ रोजी तिला तिच्या बँकेतून कॉल आला होता. तिच्या बँक खात्याचे केवायसी बाकी असल्याने तिला बँकेत काही कागदपत्रे घेऊन बोलाविण्यात आले होते. त्यामुळे ती बँकेत गेली होती. तिथेच तिची ओळख बँकेचे मॅनेजर जय मेहताशी झाली. यावेळी जयने त्याची पत्नीही दुसर्‍या बँकेत मॅनेजर म्हणून काम करत असून तो स्टॉक एक्सचेंजमध्ये तंज्ञ आहे. त्यांनी अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांना चांगला परतावा दिला आहे असे सांगितले.

नोव्हेंबर २०१८ ती पुन्हा बँकेत गेली होती. यावेळी तिने तिच्या मुलाला पाच हजार लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी जय मेहताने तिची मदत करुन तिला पुन्हा शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.२०२१ रोजी तिचा मुलगा कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेला गेला होता. यावेळी घराचे लाईट बिल, टेलिफोन बिल कसे भरायचे याबाबत ती विचार करत होती. याच दरम्यान तिथे जय मेहता हा तिच्या घरी आला होता. त्याने तिची आपलुकीने चौकशी करुन तो तिच्या मुलासारखा आहे, त्याने तिला तिच्या दैनदिन कामासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. त्याने तिच्या मोबाईलवर बँक खाते लिंक करुन दिले होते. अनेकदा जय मेहता हा तिच्या घरी येत होता. तिला गॅस, मोबाईल, इलेक्ट्रीक बिल भरुन देण्यास मदत करत होता.

ऑगस्ट २०२१ रोजी जय हा त्याची पत्नी सुनितासोबत तिच्या घरी आले होते.यावेळी त्यांनी तिला पुन्हा शेअरमध्ये ट्रेडिंग करण्याचा सल्ला देताना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. कोरोनामुळे शेअरचे भाव उतरणार असून आताच गुंतवणुक केल्यास तिला चांगला फायदा होईल असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या आमिषाला बळी पडून तिने त्यांना होकार दिला होता. सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२३ या कालावधीत त्याने तिला विविध शेअरमध्ये ७६ लाख ५० हजारांची गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या गुंतवणुकीवर जानेवारी २०२२ ते मार्च २०२४ या कालावधी तिला एकोणीस लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, मात्र जयने तिला पाच लाख रुपये दिले, उर्वरित चौदा लाख त्याने स्वतकडे ठेवले होते.

काही दिवसांनी नसीमा निजामने ही माहिती तिचा मुलगा आमीरला दिली होती. त्यानतर त्याने जयला कॉल करुन शेअर गुंतवणुकीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. जयने त्याला सहा महिन्यांत तिला व्याजासहीत संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्याने त्याचे आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे ती तिच्य मुलासोबत जयच्या मिरारोड येथील घरी गेली होती. तिथे त्यांची जयसह त्याची पत्नी, आई, वडिल आणि भावाची भेट झाली. यावेळी या सर्वांनी त्यांना काही दिवसांत ही रक्कम देतो असे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करु नका अशी विनंती केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिचे पैसे परत केले नाही.

याच दरम्यान मेहता कुटुंबिय त्यांचे मिरारोडच्या फ्लॅटमधून निघून गेले होते, चौकशीनंतर त्यांच्या घरी त्यांच्यासह इतर चार ते पाचजण आले होते. त्यांचीही मेहता कुटुंबियांनी अशाच प्रकारे आर्थिक फसवणुक केल्याची माहिती समोर आली होती. शेअर गुंतवणुकीच्या नावाने जय व त्याची पत्नी सुनिता मेहताने तिच्या बँक खात्यातून ७६ लाख ५० हजार रुपये घेतले होते, मात्र ही रक्कम शेअरमध्ये न गुंतविता त्यांनी परस्पर स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन तिची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने घडलेला प्रकार एमएचबी पोलिसांना सांगून मेहता कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जय मेहता, पत्नी सुनिता मेहता, वडिल मुकेश मेहता, आई आणि भावाविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मेहता कुटुंबिय पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या जय मेहताला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर चौघांचा सहभाग उघडकीस आल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page