शेअर गुंतवणुक फसवणुकीसाठी बॅक खाती पुरविणारा गजाआड

उत्तर सायबर सेलची कारवाई; आरोपीला न्यायालयीन कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – शेअर गुंतवणुक फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक पुरविणार्‍या एका आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. मयुर दिलीप पाटील असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने सायबर ठगांना दिलेल्या बँक खात्यात इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

संजय केशवजी संगोई हे ५३ वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील एम. जी रोडच्या जीवन आशा सोसायटीमध्ये राहतात. सध्या ते शेअर ट्रेडिंगचे काम करतात. ऑगस्ट महिन्यांत त्यांना नितीशा नावाच्या एका महिलेने मॅसेज करुन त्यांना ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. याबाबत तिने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन दिले होते. दोन दिवसांनी तिने त्यांना एका व्हॉटअप ग्रुपवर ऍड केले होते. या ग्रुपवर १५० हून अधिक सभासद होते. त्यात ग्रुप ऍडमिन कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास सभासदांना जास्त फायदा होईल याबबत माहिती देत होते.

इतकेच नव्हे तर सभासदांनी गुंतवणुक केलेल्या शेअरवर किती फायदा झाला आहे याबाबत माहिती प्रसिद्ध करत होते. त्यामुळे त्यांना ग्रुप ऍडमिन शिवकुमार आणि नितीशा यांनी ब्लॉक शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यांना एक लिंक पाठवून त्यात त्यांना फार्म भरुन देण्यास सांगून त्यांचे एक अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी विविध शेअरमध्ये १६ लाख ९१ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना इतर सभासदांप्रमाणे चांगला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी पैसे र्विड्राल करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती, मात्र ही रिक्वेस्ट रिर्टन आल होती.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या पत्नीला घडलेला प्रकार सांगितला. तिने प्लेस्टोअरमध्ये ही माहिती चेक केली, तिथे तिला अशी कुठल्याही कंपनीची माहिती दिसून आली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच संजय संगोई यांनी सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवकुमार आणि नितिशा नावाच्या दोन्ही सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मयुर पाटीलला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

तपासात त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम नंतर त्याने सायबर ठगांना पाठवली होती. याकामी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून प्राप्त झाली होती. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना एका बँक खात्याची पुरविल्याचे तपासात उघडकीस आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर मयुर पाटीलला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page