नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सासूवर चाकूने हल्ला
पवईतील घटना; जावयाविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार देणार्या जावयाने वयोवृद्ध सासूवर चाकूने हल्ला केल्याची घटना पवई परिसरात घडली. फरजाना इस्माईल शेख असे हल्ल्यात जखमी झालेल्या सासूचे नाव असून तिच्यावर जोगेश्वरतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी आरोपी जावई फिरदोस फिरोज खान याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. फिरदोस हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही घटना शनिवारी ३१ ऑक्टोंबरला सायंकाळी साडेसात वाजता पवईतील आरे रोड, फिल्टरपाडा, इस्मामिया चाळीत घडली. या चाळीतील रुम क्रमांक तीनमध्ये फरजाना ही वयोवृद्ध महिला राहते. आयशा ही तिची मुलगी असून तिचे फिरदोससोबत विवाह झाला होता. तिच्या घरापासून काही अंतरावर फिरदोस हा राहत होता. तो काहीच कामधंदा करत नाही. त्याला नशा करण्याचे व्यसन असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून होणार्या मानसिक शोषणाला तिची मुलगी गेल्या एक महिन्यांपासून तिच्याकडेच राहण्यासाठी आली होती. नशा करण्यासाठी पैशांची मागणी करुन तो तिचा मानसिक शोषण करत होता. तिने पैसे दिले नाहीतर तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता.
अनेकदा पैसे दिले नाहीतर तो स्वतवर चाकूसह ब्लेडने वार करुन दुखापत करत होता. शनिवारी सायंकाळी तो फरजानाच्या घरी आला होता. त्याने तिच्यासह आयशाकडे नशा करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच त्याने तिथे धिंगाणा घालण्यास सुरुवात केली होती. रागाच्या भरात त्याने स्वतच्या हातावर चाकूने वार करुन दुखापत करुन घेतले होते. तरीही आयशाने त्याला पैसे दिले नाही. त्याचा राग आल्याने तो तिला चाकूने मारण्यसाठी आला होता, त्यामुळे ती घाबरुन फरजानाच्या मागे लपली होती.
यावेळी फिरदोसने तिला तुला आज संपवून टाकतो असे चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यात फरजानाच्या पोटात चाकू लागला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करुन लोकांना मदतीसाठी हाक मारली होती. यावेळी स्थानिक रहिवाशांनी तिथे जाऊन फिरदोसला ताब्यात घेतले. चाकू हल्ल्यात फरजानाला दुखापत झाली होती. ही माहिती प्राप्त होताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी फिरदोसला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
जखमी झालेल्या फरजानावर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी जावई फिरदोसविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.