सिनेअभिनेता तुषार कपूरला लॉरेन्स बिष्णोईकडून खंडणीसाठी धमकी?

हरि बॉक्सरकडून आलेल्या धमकीची मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना सिनेअभिनेता तुषार कपूर याला गॅगस्टर लॉरेन्स बिष्णेाई टोळीकडून खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. हरी बॉक्सर नाव सांगणार्‍या व्यक्तीने तुषार कपूरला पाच कोटीसाठी कॉल करुन खंडणीची रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होईल अशी धमकीवजा इशारा दिला आहे. दरम्यान या कॉलसह धमकीची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. हा कॉल बोगस असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

गेल्या महिन्यांत जुहू येथे सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर तीन अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तेरा आरोपींना अटक केली होती. ते सर्वजण लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या अनिल पंडितचे सहकारी आहेत. त्याच्याच सांगण्यावरुन त्यांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला होता. याच गुन्ह्यांत सध्या मुंबई पोलिसांकडून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तीन महिलांसह तेरा आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता सिनेअभिनेता तुषार कपूर याला पाच कोटीची धमकी देण्यात आली होती. धमकी देणार्‍या व्यक्तीने तो हरि बॉक्सर असून लॉरेन्स बिष्णोईचा सहकारी असल्याचे सांगितले. या धमकीत त्याने पाच कोटी दिले नाहीतर परिणाम वाईट होतील असे म्हटले आहे.

धमकीनंतर तुषार कपूरने मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. धमकीचा एक ऑडिओ त्याच्याकडून पोलिसांना सादर करण्यात आला आहे. त्यातील ऑडिओ नोटमध्ये अज्ञात व्यक्तीने तो हरी बॉक्सर असल्याचा दावा केला आहे. मुंबई शहरात तुला सुरक्षित राहायचे असेल तर पाच कोटी खंडणी म्हणून द्यावे लागतील असे सांगितले. हरी बॉक्सरच्या आवाजाचे नमूने पोलिसांना उपलब्ध असून तुषार कपूरला धमकी देणार्‍या व्यक्तीशी त्या आवाजाचे नमूने तपासण्यात आले होते. त्यात तो आवाज हरी बॉक्सरचा नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे कोणीतरी हरी बॉक्सर आणि लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा वापर करुन तुषार कपूरला पाच कोटीची धमकी दिली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

यापूर्वीही हरी बॉक्सरने बॉलीवूडच्या अनेकांना धमक्या दिल्या आहेत. त्यात सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग यांचा समावेश आहे. बॉलीवूडसह अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती. याबाबत संबंधितांनी पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान आता तुषार कपूरला पाच कोटीची खंडणीसाठी धमकी आल्याने त्याची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.

धमकी देणारा हरी बॉक्सर हा लॉरेन्स बिष्णोईचा खास सहकारी असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. हरी चंद जाट असे त्याचे नाव असून गुन्हेगारी जगतात त्याला हरी बॉक्सर म्हणून ओळखले जाते. तो जयपूरमध्ये बॉक्सर प्रशिक्षक म्हणून काम करत होता. नंतर तो लॉरेन्स टोळीत सामिल झाला. त्याच्या सांगण्यावरुन त्याने अनेकांना खंडणीसाठी धमकी दिली आहे.

त्याच्याविरुद्ध मुंबईसह राजस्थान, पंजाब, दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यात खंडणीसाठी धमकी देणे, दरोडा, हत्येचा प्रयत्नसारखे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या तो अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. अमेरिकेतून तो लॉरेन्ससाठी काम करतो. दुसरीकडे टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर तुषार कपूरला आलेल्या पाच कोटीच्या खंडणीच्या धमकीने सिनेसृष्टीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page