सिगारेट देण्यास नकार दिला म्हणून तरुणावर तलवारीने हल्ला

रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सिगारेट देण्यास नकार दिला म्हणून उशेल रामलु निली या २९ वर्षांच्या भाजी विक्रेत्या तरुणावर दोघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सचिन ऊर्फ राहुल कनोजिया आणि अजय दिपक बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना सोमवारी रात्री साडेबारा वाजता चेंबूर येथील चेंबूर कॅम्प, गुरु सिंग सभा गुरुद्वारासमोर घडली. उशेल निली हा रामटेकडी, नानक भोजवाणी गार्डन परिसरात राहत असून तिथेच भाजी विक्रीचे काम करतो. तो दोन्ही आरोपीना ओळखत असून याच परिसरात त्यांची प्रचंड दहशत होती. सोमवारी रात्री या दोघांनी उशेलकडे सिगारेटची मागणी केली, त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याच कारणावरुन त्यांनी त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जिवे मारण्याची धमकी देत सचिनने त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली होती. यावेळी उशेलने आरडाओरड केल्यानंतर तिथे लोक जमा झाले. या घटनेनंतर ते दोघेही पळून गेले होते. जखमी झालेल्या उशेलला स्थानिक रहिवाशांनी शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी उशेलच्या जबानीवरुन पोलिसांी सचिन कनोजिया आणि अजय बनसोडे या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सचिन आणि अजय हे दोघेही रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. सचिनविरुद्ध मारामारीसह खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे, हत्येचा प्रयत्न, अपहरणासह आठ गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. अजयविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अपहरण, लैगिंक अत्याचारासह पोक्सो, विनयभंगाच्या तीन गुन्ह्यांची नोंद आहे. अजयने दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून शांतता राखण्यासाठी एक लायक जामिनदारासह बंधपत्र घेण्यत आले होते. तरीही या दोघांनी सिगारेटवरुन झालेल्या वादातून उशेल निली या तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश आरसीएफ पोलिसांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page