मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – बोगस भारतीय दस्तावेज बनवून भारतीय नागरिक असल्याची बतावणी करुन मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या अफगाणी नागरिकाला किल्ला कोर्टाने दोषी ठरवून कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हबीबुल्लाह प्रांग ऊर्फ झहीर अली खान असे या नागरिकाचे नाव असून शिक्षा भोगल्यानंतर त्याला त्याच्या मायदेशात पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वडाळा परिसरात काही अफगाणी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहाशिा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून झहीर अली खान या व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो अफगाणी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्याचयाकडे पोलिसांना पॅनकार्डसह इतर बोगस भारतीय दस्तावेज सापडले. ते दस्तावेज त्याने झहीर खान या नावाने बनविले होते. त्याचे खरे नाव हबीबुल्लाह प्रांत होते. तो मूळचा अफगाणिस्तानातील पाकिता प्रांतातील तामेर झुरमत जिल्ह्याचा रहिवाशी होता. मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्य करणे, बोगस भारतीय दस्तावेज बनविणे आदी कलमांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते.
या खटल्याची सुनावणी अलीकडेच पुर्ण झाली होती. यावेळी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून अकरा महिन्यांच्या कारावासासह आठ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्याला अफगाणिस्तानात हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस उपनिरीक्षक विजय बेंडाळे, पोलीस हवालदार रावसाहेब फुंडे यांनी केला होता. आरोपीला शिक्षा होण्यासाठी तपास अधिकारी सदानंद येरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले होते.