मेल-एक्सप्रेस प्रवासादरम्यान महिलांच्या दागिन्यांची चोरी
रेकॉर्डवरील गुन्हेगाराला चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2025
मुंबई, – मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवास करणार्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खेचून चालत्या ट्रेनमधून उतरुन पळून जाणार्या एका रेकॉर्डवरील आरोपीस कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अन्वर हुसैन शेख असे या 55 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चारही गुन्ह्यांतील 3 लाख 61 हजाराचे चोरीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
राजेंद्र गंगाराम कदम हे रत्नागिरीच्या खेड, शिवतर रोड, कोकणव्हॅलीचे रहिवाशी आहेत. 2 फेब्रुवारी 2025 रोजी ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते खेड असा नेत्रावती एक्सप्रेसच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करत होते. ही एक्सप्रेस विद्याविहार रेल्वे स्थानकात येताच त्यांच्या वयोवृद्ध आईच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ एका आरोपीने खिडकीतून हात टाकून खेचून पलायन केले होते. या घटनेनंतर त्यांनी कुर्ला रेल्वे पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गेल्या काही दिवसांत मेल-एक्सप्रेसमध्ये अशाच प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे त्याची रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाट यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, पोलीस हवालदार बागले, जाधव, कोयंडे, महिला पोलीस नाईक देसाई, पोलीस शिपाई पाटील, खाडे, रहेरे, पठाण पाटील, चव्हाण, दिघे यांनी तपासाला सुरुवात केली होती.
रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या पथकाने विद्याविहार रेल्वे स्थानकातून अन्वर हुसैन शेख या 55 वर्षांच्या एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अन्वर हा मानखुर्द येथे राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांतील 3 लाख 61 हजार रुपयांचे 56.4 ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. त्याच्या अटकेने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांतील उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.