मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – बाथरुममध्ये जाऊन कपडे काढून व्हिडीओ बनविण्यास प्रवृत्त करुन एका 72 वर्षांच्या वयोवृद्धाने त्याच्याच बारा वर्षांच्या सावत्र मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला अद्याप अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बळीत मुलगी ही बारा वर्षांची असून ती तिच्या आई, बहिणीसोबत विरार परिसरात राहते. तिच्यासह बहिण सध्या शिक्षण घेत असून आरोपी हा तिचा सावत्र पिता आहे. जानेवारी महिन्यांत तिची आई कामानिमित्त कोल्हापूरला गेली होती. त्यामुळे तिच्यासह तिची बहिण तिच्या सावत्र पित्यासोबत बोरिवलीतील एका फ्लॅटमध्ये राहत होते. 4 जानेवारीला ते तिघेही घरात होते. काही वेळानंतर तिची बहिण बाहेर खेळण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तिला मोबाईल दिला आणि बाथरुममध्ये जाऊन टी-शर्ट काढून तिचे व्हिडीओ काढण्यास सांगितले. तिने तसे करण्यास नकार दिला होता. यावेळी त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत त्याने सांगिल्याप्रमाणे केले नाहीतर परिणाम वाईट होईल असे सांगितले.
जिवाच्या भीतीने तिने बाथरुममध्ये टी शर्ट काढून तिचे काही अश्लील व्हिडीओ काढले होते. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी तिने अर्नाळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या वयोवृद्ध सावत्र पित्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी पित्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा बोरिवली येथे घडल्याने त्याचा तपास बोरिवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.