शंभर कोटीच्या कर्जासाठी 40 लाखांचा अपहार करुन फसवणुक

व्यावसायिकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 मे 2026
मुंबई, – बांधकाम व्यवसायासाठी शंभर कोटीच्या कर्जासाठी 40 लाख रुपये घेऊन एका बांधकाम व्यावसायिकाची त्याच्याच परिचित व्यावसायिकाने फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सत्यम सुखदेव सत्यार्थी या आरोपी व्यावसायिकाविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सत्यमने अशाच प्रकारे कर्जाच्या नावाखाली इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

युसूफ युनूस बावनगाववाला हे मूळचे रायगडचे रहिवाशी असून ते व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची युनिव्हर्सल इंटरप्रायझेज नावाची एक कंपनी असून या कंपनीचे कार्यालय अंधेरीतील आझादनगर क्रमांक दोन, विरा देसाई रोड, क्रिस्टल पॅराडाईजमध्ये आहे. जानेवारी 2025 रोजी त्यांची सत्यम सत्यार्थीशी ओळख झाली होती. तो त्यांच्या एका मित्रासोबत त्यांच्या कार्यालयात आला होता. या ओळखीदरम्यान त्याने त्याच्या मालकीचे सत्यार्थी इंजिनिअर प्रायव्हेट लिमिटेड आणि सत्यार्थी पॉवर अ‍ॅड इन्फा प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या दोन कंपन्या असल्याचे सांगितले. त्याने त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर तो त्यांना कर्जासाठी मदत करेल असे सांगितले होते.

त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टसाठी शंभर कोटीच्या कर्जाची गरज असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने शंभर कोटीचे कर्ज मिळवून देतो असे सांगून त्यांना त्याची कन्स्ल्टींग फी म्हणून 40 लाख रुपये द्यावे लागेल असे सांगितले. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या मित्राकडे सत्यमविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मित्राने सत्यम हा कामाचा तसेच विश्वासतला माणूस आहे, त्याने आतापर्यंत अनेकांना आर्थिक मदत करुन दिली आहे. तो त्याचा फंडा असून ही रक्कम दिल्यानंतर तो त्याच्या परिचित फायनान्स कंपनीकडून त्यांना कर्ज मिळवून देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला कर्जासाठी 40 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. याबाबत त्यांचयात एक करार झाला होता. त्यात सत्यमने त्यांना शंभर कोटीचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते,

याच कामासाठी तो त्यांच्याकडून कन्स्टल्टींग फी म्हणून 40 लाख रुपये घेणार असल्याचे नमूद केले होते. यावेळी त्याने त्यांना एक धनादेश दिला होता. कर्जाची रक्कम मिळाली नाहीतर त्यांना त्यांची फी परत करणार असल्याचे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला 40 लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. मात्र एक महिना उलटूनही त्याने त्यांना कर्जाची रक्कम मिळवून दिली नाही. विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यांच्या कर्जाचे प्रोसेसिंग सुरु असल्याचे सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयतन करत होता. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते.

सत्यमने त्यांना एक धनादेश दिला होता, त्यांनी तो धनादेश बँकेत टाकला, मात्र बँकेत धनादेश न वटता परत आला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सत्यमविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page