गुंतवणुकीच्या नावाने व्यावसायिकाची 21 लाखांची फसवणुक
खाजगी अॅपवर अज्ञात तरुणीची ओळख चांगलीच महागात पडली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 मे 2026
मुंबई, – सोशल मिडीयावर एका खाजगी अॅपवरुन ओळख झालेल्या तरुणीच्या सांगण्यावरुन खाजगी ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने व्यावसायिक तरुणाची अज्ञात सायबर ठगाने 21 लाख 50 हजाराची फसवणुक केल्याचा प्रकार भायखळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी मैत्रिणीसह तिच्या सहकार्याविरुद्ध मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. खाजगी अॅपवर अज्ञात तरुणीशी ओळख करुन मैत्री करणे तसेच तिच्या सांगण्यावरुन गुंतवणुक करणे तक्रारदार व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे.
38 वर्षांचे तक्रारदार भायखळा येथे राहत असून त्यांचा इंटेरिअर डिझायनिंगचा व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका खाजगी अॅपवर लग्नासाठी रजिस्ट्रशेन केले होते. मार्च महिन्यांत त्यांना एका तरुणीची प्रोफाईल दिसली होती. ती तरुणी आवडल्याने त्यांन तिला फे्ंरण्ड रिक्वेस्ट पाठविली होती. तिने त्यांची रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर त्यांच्यात चॅटींगवर बोलणे सुरु झाले. तिने तिचे नाव अन्यया शर्मा सांगून दिल्लीतील रहिवाशी असल्याचे सांगितले होते. चॅटींगदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे व्हॉटअप क्रमांक एकमेकांना शेअर केले होते. या क्रमांकावर ते दोघेही चॅट करत होते.
याच चॅटदरम्यान तिने ती एका खाजगी ऑनलाईन कंपनीत गुंतवणुक करत असून त्यात तिला प्रचंड फायदा झाला आहे. त्यामुळे त्यानेही कंपनीत गुंतवणुक करावी, त्याला या गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या सांगण्यावरुन त्यांनी संबंधित कंपनीत रजिस्ट्रेशन करुन सुरुवातीला 50 हजार गुंतवणुक केली होती. त्यानंतर त्यांनी मार्च ते एप्रिल 2026 या कालावधीत टप्याटप्याने कंपनीत सुमारे 21 लाखांची गुंतवणुक केली. या गुंतवणुकीवर त्यांना 69 लाख रुपये फायदा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ती रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला,
मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना ती रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने त्यांना आधी तीस टक्के रक्कम टॅक्स म्हणून भरावी लागेल, ही रक्कम भरल्यानंतर त्यांची मूळसह प्रॉफिटची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. मात्र त्यांनी तीस टक्के रक्कम भरण्यास नकार दिला. वारंवार विचारणा करुनही ते त्यांना प्रतिसाद देत नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनीी सायबर हेल्पलाईनसह मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर आरोपी मैत्रिणीसह तिच्या सहकार्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. संबंधित बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असून या गुन्ह्यांतील आरोपीविरुद्ध लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.