चारित्र्यावरुन होणार्‍या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 मे 2026
मुंबई, – चारित्र्यावरुन होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अफसाना नावाच्या एका महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिलकुमार गुप्ता ऊर्फ राजू पंडित असे या आरोपी पतीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या अलीपूरचा रहिवाशी आहे. या आत्महत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मोहम्मद इस्लाम मोहम्मद हुसैन खान हा 27 वर्षांचा तरुण रिक्षाचालक असून तो त्याच्या कुटुुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहतो. अफसाना ही त्याची बहिण असून चौदा वर्षांपूर्वी तिचे मंजूर चौधरीशी लग्न झाले होते. मंजूर हा ट्रकचालक असून लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली होती. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यातून त्यांच्यात सतत वाद होत होते. याच परिसरात अनिलकुमार हा राहत असून तिचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार नंतर मंजूरच्या लक्षात आला होता. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. पतीकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला तिने त्याच्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ती तिच्या मुलांसोबत मानखुर्द येथील मंडाळा, एकतानगर परिसरात राहू लागली होती.

गेल्या चार वर्षांपासून अनिलकुमार हा तिच्यासोबत राहत होता. तो डिलीव्हरीचे तर अफसाना ही लग्नाच्या हॉलवर कॅटरिंगचे काम करत होती. अनिलकुमारला दारु पिण्याचे व्यसन होते, याच कारणावरुन त्यांच्यात भांडण होऊ लागले होते. तिचे इतर मुलांसोबत संबंध असल्याचा आरोप करुन तो तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. अनेकदा तिच्या कामाच्या पैशांतून तो मद्यप्राशन करत होता. पतीनंतर अनिलकुमारकडून होणार्‍या छळाला ती कंटाळून गेली होती. तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यातून तिने रविवारी 10 मेला तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती समजताच मोहम्मद इस्लाम हा त्याच्या कुटुंबियासोबत तिथे गेला होता. चौकशीदरम्यान त्याला अफसाना ही रात्री उशिर कामावर आली होती. मुलांना झोपवून ती किचनमध्ये गेली आणि तिने तिथेच गळफास घेऊन जीवन संपविले होते.

हा प्रकार अनिलकुमारच्या लक्षात येताच तो घरातून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्रााप्त होताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अफसानाला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अफसानाच्या मोबाईलमध्ये पोलिसांना एक व्हिडीओ सापडला. त्यात तिने अनिलकुमारसोबत तिचे आठ ते नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याच्याशी लग्न केले. त्याने तिचे सर्व दागिने गहाण ठेवले आहे. त्याच्यासाठी सर्व काही केले, मात्र तो तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. त्यामुळे मी माझ्या आयुष्याला कंटाळून गेली आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला अनिलकुमार हाच जबाबदार असल्याचे नमूद केले होते.

या व्हिडीओनंतर पोलिसांनी अफसानाचा भाऊ मोहम्मद इस्लामच्या तक्रारीवरुन अनिलकुमारविरुद्ध अफसानाचा मानसिक व शारीरिक शोषण करणे, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page