कारच्या धडकेने ६२ वर्षांच्या अज्ञात वयोवृद्धाचा मृत्यू
अपघातप्रकरणी ८० वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२६
मुंबई, – कारच्या धडकेने एका ६२ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. मृत वयोवृद्धाची ओळख पटल नसून त्याची ओळख पटावी यासाठी वांद्रे पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी राशिद जाल खंबाटा या ८० वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. चौकशीनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
हा अपघात शुक्रवारी १७ जुलैला सायंकाळी सव्वाचार वाजता वांद्रे येथील वोडाफोन कार्यालयासमोरील अप्पा परब चौकात झाला. सुरज सुभाष म्हात्रे हे माहीम येथे राहत असून सध्या वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी सायंकाळी ते परिसरात गस्त घालत होते. यावेळी वोडाफोन कार्यालयासमोर एक अपघात झाल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली होती. त्यामुळे ते घटनास्थळी रवाना झाले होते. तिथे त्यांना एक वयोवृद्ध व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आला. त्यामुळे त्यांनी त्याला तातडीने जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
प्राथमिक तपासात एका कारने संबंधित व्यक्तीला धडक दिली होती, त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मृत वयोवृद्धाकडे त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्याचे वय अंदाजे ६२ वर्ष असून रस्त्यावरुन जात असताना त्यांना कारने जोरात धडक दिल्याचे उघडकीस आले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी कारचालक राशिद खंबाटा या वयोवृद्धाला ताब्यात घेऊन वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले.
राशिद हा वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओजवळील साईट आशिष अपार्टमेंटमध्ये राहत असून तो सध्या एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाला आहे. याप्रकरणी सुरज म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राशिद खंबाटा याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत वयोवृद्धाची ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.