एटीएममध्ये प्लास्टिक फाईल-पट्टी लावून खातेदारांच्या पैशांवर डल्ला

गुन्हा दाखल होताच दोन महिलांसह तिघांना मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२६
मुंबई, – एटीएममध्ये प्लास्टिक फाईल-पट्टी लावून खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारणार्‍या एका टोळीचा भांडुप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मोहम्मद जियाद ऊर्फ आयान इर्शाद अहमद, आरिफा अझीम दुकानदार आणि निमरा अझीम दुकानदार अशी या तिघांची नावे आहेत. या आरोपींकडून गुन्ह्यांतील बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत या तिघांनी पाच खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार महिला रिचा अरुण श्रीवास्तव या बँक मॅनेजर आहेत. भांडुपच्या सचदेव कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या बँकेचे एक एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्याची तक्रार बँकेला प्राप्त झाली होती. प्लास्टिक फाईल-पट्टी लावल्याने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी कोणी खातेदार आल्यास एटीएममधून पैसे येत नव्हते. मात्र त्यांना एटीएमच्या स्क्रिनवर पैसे डेबीट झाल्याचे मॅसेज येत होते. अशा प्रकारे पाच खातेदारांनी बँकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बँकेच्या वतीने रिचा श्रीवास्तव यांनी भांडुप पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख यांनी गंभीर दखल घेत भांडुप पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अजय जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, पोलीस हवालदार दिपक लहाने, जयवंत मोरे, श्रीकांत माळी यांनी तपास सुरु केला होता.

एटीएमसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांना एका पुरुषासह दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद दिसून आले. संबंधित आरोपी खातेदार पैसे काढण्यापूर्वीच एटीएम मशिनमध्ये प्लास्टिक फाईल-पट्टी लावत होते, एटीएमममध्ये पैसे अडकल्यानंतर ते पैसे घेऊन निघून जात होते. या फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद जियादला ताब्यात घेतले,

चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली देताना त्याला याकामी आरिफा आणि नमिरा दुकानदार या दोघींनी मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघींना पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील बाईक, प्लास्टिक रंगाची पट्टी, मोबाईल फोन, ३९ हजार ५०० रुपयांची कॅश असा १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page