मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२६
मुंबई, – तिसर्या विवाहानंतर वादाच्या भोवर्यात सापडलेला बॉलीवूडचा मिस्टर परफेस्टनिस्ट सिनेअभिनेता आमीर खान याला लॉरेन्स बिष्णोाई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये आमीरवर लव्ह जिहादचा आरोप करुन त्याने सनातन धर्म, भारतीय संस्कृतीच्या विरोधात कथित कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी आमदार बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर सिनेअभिनेता सलमान खान आणि सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबारासह धमकीनंतर आता आमीर खान हा बिष्णेाई टोळीच्या हिटलिस्टवर असल्याचे बोलले जाते. या धमकीची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु असून तपासानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान या धमकीनंतर आमीरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
अलीकडेच आमीर खानने तिसरा विवाह केला होता. या विवाहानतर आमीरवर सोशल मिडीयावर प्रचंड टिका झाली होती. या टिकेनंतर आमीरकडून स्वतची बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला होता. तरीही सोशल मिडीयावर त्याच्याविरोधात उलटसुलट चर्चा सुरुच आहे. त्यात आता लॉरेन्स बिष्णोई टोळीची भर पडली आहे. सोशल मिडीयावर बिष्णोई टोळीकडून एक पोस्ट करण्यात आली असून त्यात आमीरला अप्रत्यक्षपणे धमकी देण्यात आली आहे. त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप करुन सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधातील कथित कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुक पोस्ट आणि एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून या धमकीची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे.
या पोस्टसह ऑडिओ क्लिपची पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. दरम्यान या धमकीबाबत आमीरसह त्याच्या टिमकडून अद्याप पोलिसांना कुठलीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नाही. त्यांना थेट ही धमकी देण्यात आली नाही, मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमकी मिळाल्याने बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पोस्ट आणि ऑडिओ क्लिप कोणी अपलोड केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. आरजू आणि टायसन बिष्णोई यांच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्म आणि राष्ट्राच्या विरोधातील कृत्यांचे बिष्णोई टोळीकडून समर्थन केले जात नाही. त्यामुळे आमीरला लवकरच प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे पोस्टद्वारे आमीरला धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.
आमीर सध्या वांद्रे येथे राहत असून त्याच्या घरी गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसांची टिम गेली होती. यावेळी आमीरशी पोलिसांनी चर्चा करुन त्याच्या बंदोबस्ताबाबतची विचारणा केली होती. या ीेटीनंतर त्याला पोलिसांकडून योग्य पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. यापूर्वी बिष्णोई टोळीकडून सिनेअभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची अनेकदा धमकी आली होती. त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर बिष्णोई टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. असाच गोळीबार सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरासमोर झाला होता. त्यानंतर या टोळीकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. आता आमीर खानला आलेल्या धमकीनंतर तो बिष्णोई टोळीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.