हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपीस दोन वर्षांनी अटक
पूर्ववैमस्नातून तरुणाची तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२६
मुंबई, – हत्येचा गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस दोन वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अजय बजरंग पवार असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला ट्रॉम्बे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जून २०२४ साली पूर्ववैमस्नातून अजयसह त्याच्या पाच ते सहा सहकार्यांनी अक्षय जालिंदर तिकुडवे या तरुणाची चॉपर, चाकू आणि तलवारीने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर अजय हा पळून गेला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो स्वतचे अस्तित्व बदलून मानखुर्द परिसरात राहत होता, अखेर दोन वर्षांनी त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले.
अमोल जालिंदर तिकुडवे हा नवी मुंबईतील कौपरखैरणे परिसरात राहत असून अक्षय हा त्याचा भाऊ आहे. पाणी सप्लायचे काम करणारा अक्षय हा त्याच्याच शेजारी राहत होता. १९ जून २०२४ रोजी अमोल हा त्याच्या घरी होता. रात्री सव्वादोन वाजता त्याला अक्षयचा मित्र सागर सुर्वेचा कॉल आला. त्याने अक्षयवर काही लोकांनी तलवार, कोयता, चाकूसारख्या घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला असून रक्तबंबाळ झालेल्या अक्षयला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अमोल हा शताब्दी हॉस्पिटलमध्ये आला होता. तिथे त्याला अक्षयला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगितले.
चौकशीदरम्यान अक्षय हा त्याच्या मित्रांसोबत चेंबूरच्या गावडे चाळ मैदानात बसले होते. यावेळी तिथे रविंद्र दास, अभिजीत ओव्हाळ, पियुष जाधव, प्रणेश नायसडू, आकाश मांडवकर, शशिकांत यादव व इतर दोन ते तीनजण आले. काही कळण्यापूर्वीच या टोळीने अक्षयवर प्राणघातक हल्ला केला होता. तिक्ष्ण हत्याराने वार झाल्याने त्याच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती हॉस्पिटलमधून प्राप्त होताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अमोल तिकुडवे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रविंद्र दास, अभिजीत शशिकांत ओव्हाळ, पियुष रमेश जाधव ऊर्फ लाल्या, प्रणेश प्रमोद नायडू ऊर्फ सिद्धू, आकाश मांडवकर, शशिकांत यादव व इतर तिघांविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच चार ते पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. इतर फरार आरोपीचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. ही शोधमेाहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील एक वॉण्टेड आरोपी अजय पवार हा मानखुर्द परिसरात स्वतचे अस्तित्व बदलून राहत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर याला मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, पोलीस हवालदार तुपे, पोलीस शिपाई बोडारे, महिला पोलीस शिपाई मयुरी पाटील यांनी मानखुर्द परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
या पथकाने मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर, नवनाथ चाळीजवळील रायेश्वर चाळीत वास्तव्यास असलेल्या अजय पवार याला ताब्यात घेतले. चौकशीत तो हत्येच्या गुन्ह्यांत गेल्या वर्षांपासून वॉण्टेड असलेला आरोपी असल्याचे उघडकीस आले. हत्येनंतर तो पळून गेला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो रायरेश्वर चाळीत राहत होता. कॅटरिंगचे काम करणार्या अजयने स्वतची ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दोन वर्षांनी पोलिसांनी अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत अन्य एका गुन्ह्यांची नोंद आहे.