हॉस्पिटलसाठी जागा देतो असे सांगून सहा डॉक्टरांची फसवणुक
४० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – मालाडच्या माईंडस्पेस, बनारसी हाईट्समध्ये हॉस्पिटलसाठी जागा देतो असे सांगून भाडेस्वरुपात घेतलेल्या सुमारे ४० लाखांचा अपहार करुन सहा डॉक्टरांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिससरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध चारकोप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पवन बैरागरा आणि उर्मिला बैरागरा अशी या दोघांची नावे असून त्यांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे. या जोडप्यांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
४८ वर्षाचे सागर विलास करवीर हे डॉक्टर असून ते मालाडच्या मालवणी परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे कांदिवलीतील चारकोप परिरात आयुष नर्सिग होम नावाचे एक हॉस्पिटल आहे. त्यांच्यासह त्यांचे पाच डॉक्टर मित्र दिनेश कस्तुरे, सचिन देठे, भूषण केसरकर, दिपक रसाळ आणि प्रदीप यांना एक मोठे हॉस्पिटल सुरु करायचे होते. त्यासाठी ते सर्वजण जागेचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांच्या चारकोप येथील हॉस्पिटलमध्ये पवन आणि त्याची पत्नी उर्मिला बेरागरा हे पेशंट म्हणून ऍडमिट झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्याशी सागर करवीर यांची चांगली ओळख आणि नंतर मैत्री झाली होती. अनेकदा चर्चेदरम्यान ते त्यांना हॉस्पिटलच्या जागेबाबत सांगत होते. यावेळी या दोघांनी त्यांना त्यांच्या मालकीची मालाड येथील माईंडस्पेस, बनानसी हाईट्समध्ये एक कार्यालय आहे.
या इमारतीचे बांधकाम त्यांनीच केले असून इमारतीच्या बेसमेंट तळ आणि पहिला मजला त्यांना भाड्याने द्यायचा आहे. त्यामुळे ती जागा त्यांनी हॉस्पिटलसाठी भाड्याने घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी हॉस्पिटलसाठी तीच जागा घेण्याचे ठरविले होते. याबाबत त्यांनी त्यांच्या इतर पाच सहकारी डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यांनी त्यांना होकार दर्शविला होता. चर्चेअंती बैरागरा आणि करवीर यांच्यात बनारसी हाईट्स इमारतीच्या बेसमेंट, तळ आणि पहिल्या मजल्याच्या हॉस्पिटलसाठी दरमाह १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचे भाडे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी त्यांना सहा महिन्यांचे ६३ लाख ५० हजार ४०० रुपयांचे भाडे आगाऊ देण्याचे ठरले होते. तीन ते चार मिटींगनंतर त्यांच्यात एकमत झाले आणि याबाबतचा एक करार झाला होता. या करारानंतर सागर करवीर यांनी त्यांना टप्याटप्याने ४९ लाख ८५ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. जून २०२१ रोजी पवन आणि उर्मिला बैरागरा हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या भाच्याने या जागेवर कर्ज काढल्याचे सांगितले.
या माहितीने त्यांना धक्काच बसला होता. जागेवर कर्ज घेतले असता ती जागा त्यांनी भाड्याने देण्याचा व्यवहार का केला असे सांगून सागर करवीर यांनी त्यांच्यासोबतचा जागेचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे हॉस्पिटलच्या जागेसाठी भाड्याने दिलेली रक्कम परत करण्यास सांगितले. काही दिवसांनी त्यांनी त्यांना दहा लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित पैसे देण्यास ते दोघेही टोलवाटोलवी करत होते. त्यामुळे सागर करवीरने त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवनने त्यांना भेटण्यास नकार दिला. त्यांनी घरात प्रवेश केला तर त्याची पत्नी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची केस करण्याची धमकी दिली. तरीही त्यांनी त्याच्याकडे पैशांसाठी पाठपुरावा ठेवला होता.
पाच वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. त्यानंतर सागर करवीरसह इतर पाचही डॉक्टरांनी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पती-पत्नीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पवन बैरागरा आणि उर्मिला बैरागरा या दोघांविरुद्ध दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी हॉस्पिटलच्या जागेसाठी भाडे स्वरुपात घेतलेल्या पैशांचा अपहार करुन डॉक्टरांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी पती-पत्नीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.