विदेशातून आयात केलेला निकोटीयन हुक्का फ्लेवर्सचा साठा जप्त
तीन कोटीच्या हुक्का फ्लेवर्ससह व्यावसायिकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 नोव्हेंबर 2025
मुंबई, – महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या निकोटीयन व वैधानिक इशारा नसलेल्या विविध हुक्का फ्लेवर्स विदेशातून आयात करुन त्याची विविध आस्थापना आणि वितरकांच्या माध्यमातून विक्री करणार्या एका व्यावसायिकाला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. सचिन सुशीलकुमार सुरी असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून त्याच्या मालकीचे एस. क्यूब डिस्ट्युब्युशन एजन्सी आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 कोटी 1 लाख 92 हजार 636 रुपयांचा हुक्का फ्लेवर्सचे एकूण 1831 बॉक्स जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता व अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
सचिन सुरी हा व्यावसायिक असून त्याच्या मालकीचे चिंचबंदर येथील उमरखाडी, आनंदराव सुर्वे मार्गावर एस. क्युब डिस्ट्यूब्युशन एजन्सी नावाची एक कंपनी असून याच कंपनीचे तिथे एक गोदाम आहे. महाराष्ट्र शासनाने हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणार्या निकोटीयन हुक्का फ्लेवर्सवर बंदी घातली होती. तरीही काहीजण अशा हुक्का फ्लेवर्सची विक्री करत असल्याची माहिती युनिट एकच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते.
या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे, देवीदास लाब्दे, पोलीस उपनिरीक्षक धिरज कांबळे, जितेंद्र शेडगे, संतोष देसाई, पोलीस हवालदार शिंदे, जुवाटकर, निंबाळकर, घुगे, माने, पोलीस शिपाई शिंदे, सावंत यांनी अशा आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. ही माहिती काढताना सचिन सुरी याच्या उमरखाडीतील गोदामात विदेशातून आयात आलेल्या निकोटीयनहुक्का फ्लेवर्सचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मंगळवारी सायंकाळी चार वाजता या पथकाने एस. क्यूब डिस्ट्युब्युशन एजन्सीच्या गोदामात अचानक छापा टाकला होता.
यावेळी पोलिसांना विविध हुक्का फ्लेवर्सचे 1831 बॉक्स सापडले होते. त्यात 3 कोटी 1 लाख रुपयांचा हुक्का फ्लेवर्स सापडले. याच गुन्ह्यांत सचिन सुरी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विदेशातून निकोटीयन व वैधानिक इशारा नसलेला विविध हुक्का फ्लेवर्स विदेशातून आयात केल्याचे तसेच या हुक्का फ्लेवर्सचा मुंबईसह महाराष्ट्रातील विविध आस्थापना आणि वितरकांना विक्री केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
त्याच्याविरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत सचिनची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याने निकोटीयन हुक्का फ्लेवर्सची कोणत्या आस्थपना-वितरकांना विक्री केली आहे, त्याला विदेशातून ते हुक्का फ्लेवर्स कोण पाठवत होता. त्याचा हा व्यवसाय किती वर्षांपासून सुरु होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.