ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

एअरपोर्टजवळील हॉटेलमध्ये साकिनाका पोलिसांची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दुबईत वास्तव्यास असलेल्या सायबर ठगांना ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्‍या एका टोळीचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह चौघांना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद मसूद अब्दुल वसीम, अब्दुल्ला लारे अहमद शेख, नूरआलम आशिकअली खान आणि मनिष कोटेश नंदाला अशी या चौघांची नावे आहेत. यातील मोहम्मद मसूद हा टोळीचा मुख्य आरोपी असून मूळचा बंगलोरचा रहिवाशी आहे. तोच दुबईतील मोहसीन आणि जाफर नावाच्या दोन सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्यासाठी तो विविध बँकेची माहिती पुरविण्याचे काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर चौघांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात अब्दुल खालिक अब्दुल कादिर खान, अरबाज फजलानी, मोहसीन आणि जाफर यांचा समावेश आहे. मोहसीन आणि जाफरच्या अटकेसाठी पोलिसांकडून लवकरच रेड कॉर्नर नोटीस बजाविली जाणार आहे.

साकिनाका येथील एअरपोर्ट रोड, एमटीएनएल जंक्शनजवळील समिथा कॉम्प्लेक्सच्या गुलाब इस्टेटमध्ये हॉटेल गेटवे स्टार आहे. याच हॉटेलच्या एका रुममध्ये काही आरोपी ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खात्याची माहिती त्यांच्या दुबईतील मुख्य सायबर ठगांना पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, पोलीस हवालदार किरण कोरे, अहेर, गवारे आदी पथकाने हॉटेलमधील रुम क्रमांक 208 मध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या मोहम्मद मसुदला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत 25 वर्षांचा मोहम्मद मसुद हा मूळचा बंगलोरचा रहिवाशी आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याने केलेले कॉल, त्याला आलेले कॉल, मॅसेज, व्हॉटअप चॅटवरुन तो दुबईतील मोहसीन, जाफर या दोन व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. याबाबत विचारणा केल्यानंतर तो ऑनलाईन फसवणुकीसाठी दुबईत वास्तव्यास असलेल्या सायबर ठगांना बँक खाती पुरविण्याचे काम करत असल्याचे उघडकीस आले. याकामी त्याला इतर काही सहकारी मदत करत होते.

बोगस दस्तावेजाच्या मदतीने ते त्याला बँक खात्याची माहिती देत होते. या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. त्याच्या माहितीनंतर पोलिसांनी अब्दुल्ला, नूरआलम आणि मनिष या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना मुंबईसह बंगलोर येथील काही बँक खात्यासंदर्भातील दस्तावेज सापडले. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, एटीएम कार्ड, बँक खात्याला लिंक असलेले सिमकार्ड, चार मोबाईल, पासपोर्ट, युएई आयडी, विविध कंपनीचे सात सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.

आरोपींच्या चौकशीत ही टोळी दुबईतील सायबर ठगांच्या संपर्कात राहून त्यांच्यासाठी काम करत होती. याकामी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. यातील मोहम्मद मसुद हा मुख्य आरोपी असून तो दुबईतील मोहसीन आणि जाफर नावाच्या सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरुन तो इतर आरोपींच्या मदतीने बँक खात्याची माहिती काढून ती माहिती त्यांना पुरविल्याचे काम करत होता. या टोळीने सायबर ठगांना आतापर्यंत अनेक बँक खात्याची माहिती दिल्याचे बोलले जाते.

या चौघांविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या चारही आरोपींना बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page