19 लाखांच्या सोने, हिरेजडीत दागिन्यांच्या चोरीने खळबळ
चोरीच्या गुन्ह्यांत 32 वर्षांच्या मोलकरणीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दिवाळीच्या सुट्टीनिमित्त माथेरानला गेलेल्या एका व्यावसायिकाच्या घरी सुमारे 19 लाखांच्या हिरे, सोन्याच्या विविध दागिन्यांची चोरीच्या घटनेने कांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच कुलजीत गुरुपालसिंग गिल या 32 वर्षांच्या आरोपी मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. या चोरीमागे तिचा सहभाग नसल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले असले तरी तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
ही घटना 25 ऑक्टोंबरला साडेदहा ते अकराच्या सुमारास कांदिवलीतील महावीरनगर, प्रणय-दिव्या सहकारी सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या बी विंगच्या फ्लॅट क्रमांक 501 मध्ये आलेख जयेश दोषी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा ग्रॅटरोड येथे ग्लोबल अॅनेक्स नावाने मोबाईल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे कुलजीतसह इतर दोन महिला मोलकरीण म्हणून कामाला आहे. कुलजीत ही कांदिवलीतील पवार पब्लिक स्कूलजवळील शांतीनिकेतनमध्ये राहत असून तिच्यावर जेवण बनविण्याची जबाबदारी होती. त्यांची बहिण विधी विवेक शहा ही विवाहीत असून जून महिन्यांत तिला एक मुलगी झाली होती. तेव्हापासून ती त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहत आहे.
विविध कार्यक्रमासाठी तिने तिचे सर्व सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणले होते. ते दागिने तिने तिच्या बेडरुममधील कपाटात ठेवले होते. दिवाळीची सुट्टी असल्याने 24 ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोंबर दरम्यान संपूर्ण आलेख दोषी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत माथेरान येथे फिरायला गेले होते. तिथे जाण्यापूर्वी त्यांची बहिण विधी आणि आई दिप्ती यांनी सर्व दागिने कपाटात सुरक्षित ठेवले होते. 26 ऑक्टोंबरला रात्री ते सर्वजण रात्री दहा वाजता घरी आले होते. 27 ऑक्टोंबरपासून ते सर्वजण त्यांच्या दैनदिन कामात व्यस्त होते. 29 ऑक्टोंबरला त्यांच्या घरी विधीच्या मुलीसाठी एका कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तिने कपाटातील दागिने काढण्यचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला कपाटातून सुमारे 19 लाखांचे विविध सोन्याचे, हिरेजडीत दागिने गहाळ असल्याचे दिसून आले.
तिने कपाटात दागिन्यांचा शोध घेतला, मात्र तिला कुठेही दागिने सापडले नाही. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच आलेख दोषी यांनी घरातील तिन्ही मोलकरणीची चौकशी केली होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. माथेरानला गेल्यानंतर त्यांच्या घरी कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांनी इमारतीमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केलीह ोती. त्यात त्यांना कुलजीत गिल ही 25 ऑक्टोंबरला सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान जिन्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाताना आणि बाहेर जाताना दिसून आली होती. ती त्यांच्याशिवाय इतर कोणाकडे काम करत नव्हती.
या चोरीमागे कुलजीत गिल हिचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करुन आलेख दोषी यांनी कांदिवली पोलिसांत कुलजीत गिल हिच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कुलजीत गिल हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने चोरी केल्याचा इन्कार केला होता. मात्र तिनेच चोरी केल्याचा संशय असल्याने तिच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चोरीचे दागिने अद्याप पोलिसांनी हस्तगत केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.