फसवणुकीसह गेमिंग ऍपसाठी बँक खाती पुरविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

बँक खात्याशी संबंधित मुद्देमालासह पाचजणांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जुलै २०२६
मुंबई, – सायबर फसवणुकीसह ऑनलाईन गेमिंग ऍपसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून बँक खात्याशी संबंधित मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोहम्मद शब्बीर अब्दुल करीम, चिराग मोहनलाल चावडा, भावेश हिर्जी महेश्‍वरी, रोहन मोहनलाल चावडा आणि गोविंद वीरजी बुचिया अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने बुधवार ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने सायबर ठगांना मोठ्या प्रमाणात बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मशिदबंदर येथील एका इमारतीमध्ये जी. डी ओव्हरसीज नावाच्या खाजगी कपंनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून मुंबईतील विविध बँकेत चालू खाते उघडण्यात आले आहे. सिमकार्ड आणि बँक खाते ऍक्टिव्ह करुन ते सिमकार्ड तसेच बँक खात्याची माहिती दुबईतील काही सायबर ठगांना पाठविली जाते. संबंधित सायबर ठग सायबर फसवणुकीसह ऑनलाईन गेमिंग ऍपसाठी या बँक खात्याचा वापर करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, पोलीस उपनिरीक्षक शेख, घाटोळ, पोलीस हवालदार बोरसे, थिटमे, पोलीस शिपाई घरत, जाधवर, सय्यद, आव्हाड, शिंदे, कळसाने आदी पथकाने जी. डी ओव्हरसीज या कार्यालयात छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांनी विविध बँकेचे ६६ एटीएम कार्ड, दोन लिनोवो कंपनीचे संगणक, कॅनॉन कंपनीचा कलर प्रिंटर, बारा मोबाईल, सिमकार्ड, वेगवेगळ्या बँकेचे पंधरा पासबुक, १२२ चेकबुक, दोन पेनड्राईव्ह, विविध कंपनीच्या ६८ रबरी शिक्के, वेगवेळ्या बँक अकाऊंटचे ओपनिंग फॉर्म, वीज बिल, विविध कंपनीचे उद्यम नोंदणी प्रमाणपेत्र आदी मुद्देमाल हस्तगत केला. आतापर्यंत १४२ बँक खात्याचे ऍक्सेस पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यापैकी काही बँक खात्यात अठरा गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे.

यावेळी तिथे असलेल्या मोहम्मद शब्बीर करीम, चिराग चावडा, भावेश महेश्‍वरी, रोहन चावडा, आणि गोविंद बुचिया या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत ते सर्वजण दुबईतील काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांना संबंधित आरोपी सायबर फसवणुकीसह ऑनलाईन गेमिंग ऍपसाठी बँक खात्याची माहिती पुरविण्याचे काम करत होते. प्रत्येक खात्यामागे त्यांना भरमसाठ कमिशन मिळत होती. गेल्या काही वर्षांत त्यांनी दुबईतील या सायबर ठगांना विविध बँक खात्याची माहिती दिली आहे. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती.

तपासात आलेल्या या माहितीनंतर या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर पाचही आरोपींना शनिवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page