फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या तिघांना अटक
जॉब टास्कद्वारे अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस
अरुण सावरटकर
६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अनस आलम शेख, शहनवाज अख्तर खान ऊर्फ शानू आणि खालिद नवाज खालिक ऊर्फ सोनू अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मालाडच्या मालवणीतील रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत यापूर्वी साद सोहेल चव्हाण या आरोपीस पोलिसांनी अटक केली. या तिघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. ही टोळी जॉब टास्कद्वारे फसवणुक करणार्या मुख्य सायबर ठगांना मदत करत होते, त्यांच्यासाठी काही तरुणांकडून त्याचे वैयक्तिक दस्तावेज घेऊन त्याद्वारे विविध बँकेत खाती उघडून त्याची माहिती सायबर ठगांना देत होते. या बँक खात्यात वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
देवांश अवनिदकुमार सिंग हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या तरुण मालाड येथे राहतो. त्याचे बीटेक संगणक सायन्सचे शिक्षण झाले असून तो सध्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ३ जूनला त्याला एका अज्ञात व्यक्तीचा मॅसेज आला होता. त्यात त्याने त्याला पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. युट्यूब लिंक ओपन करुन त्यावरील फुट रेसीपीचे व्हिडीओ लाईक करुन ते स्क्रिनशॉर्ट शेअर करण्याचा हा टास्क होता. या टास्कद्वारे त्याला चांगला फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याने त्याला होकार दर्शविला होता. यावेळी विष्णू शर्मा नावाच्या एका व्यक्तीने त्याला काही टास्क दिले होते. त्यानेही दिलेले टास्क पूर्ण केले होते. प्रत्येक टास्कवर त्याला दिडशे रुपयांचे कमिशन मिळत होते. ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात जमा होत होती. त्यामुळे त्याला त्यांच्याावर विश्वास निर्माण झाला होता. याच दरम्यान त्याला एका ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते.
या ग्रुपमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे टास्क दिले जात होते. त्यांनी त्याला मूव्ही रिव्हीव करण्यास सांगून त्यात चांगले कमिशनचे गाजर दाखविले होते. त्यामुळे त्याने संबंधित टास्क पूर्ण केले होते. त्यासाठी त्याला प्रत्येकी सहाशे रुपये मिळत होते. त्यानंतर ऍडमिनने ग्रुपमधील सभासदांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून त्यांना टास्कसाठी काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या टास्कच्या माध्यामातून त्यांना जास्त कमिशन मिळणार होते, त्यामुळे त्याने टास्कसाठी पैसे गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी त्याला एक लिंक पाठविण्यात आली होती. या लिंकवर रजिस्ट्रेशन करुन त्याचे एक अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. तो अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करुन टास्क पूर्ण करत होता. त्यात त्याला चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले.
मात्र त्याला त्याच्याच अकाऊंटमधून पैसे काढता येत नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्याला अकाऊंट अपडेटचा सल्ला दिला, नंतर त्याचे अकाऊंट फ्रिज झाले आहे असे सांगून त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. अकाऊंट अपडेटसह फ्रिज काढण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे ९ लाख ६५ हजाराची मागणी केली. त्यामुळे त्याने ती रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर ते त्याच्याकडे आणखीन २८ लाखांची मागणी करत होते. ही रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांनी त्याला सोळा लाख रुपये भरण्याचा सल्ला दिला. टास्कसह अकाऊंटमधीन कॅश विड्रॉल करण्यासाठी त्याने आतापर्यंत २१ लाख १६ हजार २५० रुपये ट्रान्स्फर केले होते, त्यासाठी त्याने काही मित्रांकडून उधारीने पैसे घेतले होते. आणखीन पैसे ट्रान्स्फर करणे शक्य नसल्याचे सांगताच त्यांनी त्याला प्रतिसाद देणे बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन साद चव्हाण याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपींची नावे समोर आली होती. त्यानंतर मालाडच्या मालवणी येथून या पथकाने अमन शेख, शहनवाज खान आणि खालिद खलिक या तिघांना अटक केली.
तपासात अनसने सादला पैशांचे आमिष दाखवून त्याच्या नावाने एका खाजगी बँकेत खाते उघडण्यास प्रवृत्त केले होते. या खात्याची माहिती त्याने शहनवाजला दिली. त्याने ते खाते सायबर ठगांना फसवणुकीसाठी वापरण्यास दिले होते. या खात्यात जमा झालेली रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम त्यांनी कमिशन म्हणून आपसांत वाटून घेतली. शहनवाज बँकेची माहिती आधी खालिदला देत होता. त्यानंतर तो या खात्याची माहिती पुढे देत होता.
खालिदच्या चौकशीत त्याने सादसह इतर तरुणांकडून प्राप्त झालेले बँक खाते आफम आणि शोएब या दोन व्यक्तींना दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोघांना वॉण्टेड आरोपीस दाखविण्यात आले आहे. या टोळीने उघडलेल्या बँक खात्याचा फसवणुकीसाठी वापर झाला असून देशभरात वेगवेगळ्या गुन्ह्यांतील रक्कम संबंधित खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.