गाणी लावण्यावरुन झालेल्या वादातून भावासह पुतण्याची हत्या
दुहेरी हत्येप्रकरणी आरोपी बंधूंसह तिघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२६
मुंबई, – गाणी लावण्यावरुन झालेल्या भांडणातून भावासह पुण्याची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या झाल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. त्यात सुनिल कालिचरण विश्वकर्मा आणि त्यांचा चौदा वर्षांचा मुलगा श्लोक सुनिल विश्वकर्मा यांचा समावेश आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दुहेरी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी बंधूंसह तिघांना पोलिसांनी अटक केली. सुरज विश्वकर्मा, सुरेंद्र ऊर्फ सोनू विश्वकर्मा आणि प्रिती सुरेंद्र विश्वकर्मा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
ही घटना गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजता विक्रोळीतील पार्कसाईट, सुजाता हॉटेल, शिवछाया सोसायटी, विजयकुमार गुप्ता याच्या घराशेजारी घडली. याच परिसरात अंजू सुनिल विश्वकर्मा ही महिला तिच्या कुटुंबियासोबत राहते. सुनिल हा तिचा पती तर श्लोक मुलगा आहे. बुधवारी रात्री उशिरा सुनिल हा कामावरुन घरी आला होता. यावेळी तिचा दिर सुरेंद्र याने मोबाईलवर गाणी लावले होते. याच गाण्यावरुन सुनिलने सुरेंद्रला त्याची पत्नी आंघोळीला गेल्यानंतर तो अश्लील गाणी का लावतो याबाबत जाब विचारला होता. त्यावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचा राग आल्याने सुरजने सुनिलवर तर सुरेंद्रने श्लोकवर चाकूने वार केले होते. त्यात त्यांच्या कपाळावर आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली होती.
इतकेच नव्हे तर अंजूने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिच्यासह तिचा दुसरा मुलगा विवाहन यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तिने पळून जाऊ नये म्हणुन सुरेंद्रची पत्नी प्रितीने बाहेरुन कडी लावण्याचा प्रयत्न केला. अचानक सुरु झालेल्या आरडाओरडीनंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही माहिती समजताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या सुनिल आणि श्लोक यांना पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी अंजू विश्वकर्मा हिची जबानी नोंदवून घेतली होती.
तिच्या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दुहेरी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सुरज विश्वकर्मा, सुरेंद्र विश्वकर्मा आणि प्रिती विश्वकर्मा या तिघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या दुहेरी हत्येने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.