फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्रिवेणी डेव्हल्परच्या संचालकाला अटक
फ्लॅटच्या ४३ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्रिवेणी डेव्हल्पर कंपनीचा संचालक आणि बिल्डर मिहीर अशोक जेठवा याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर एका खाजगी कंपनीच्या आयटी मॅनेजरची फ्लॅटच्या आमिषाने सुमारे ४३ लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध फ्लॅट फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याच्यासह त्याचे बिल्डर वडिल अशोक जेठवा यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.
केवीन अल्विटो परेरा हे बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहत असून एका नामांकित स्टॉक ब्रोकर कंपनीत आयटी मॅनेजर म्हणून काम करतात. २०१५ साली त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे ते बोरिवली परिसरात टू बीएचके फ्लॅटचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांना त्रिवेणी डेव्हल्पर कंपनीच्या बोरिवलीतील एका निर्माणधीन इमारतीच्या प्रोजेक्टची माहिती दिली होती. त्यामुळे ते त्याच्यासोबत कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथेच त्यांची मिहीर जेठवाशी ओळख झाली होती. मिहीर हा त्रिवेणी डेव्हल्परचा संचालक असून त्याचे वडिल अशोक जेठवा याच्या मालकीची ही कंपनी आहे. ते दोघेही पिता-पूत्र कंपनीचे सर्व व्यवहार पाहत होते.
या भेटीदरम्यान मिहीरने त्यांच्या आयसी कॉलनीतील कावेरी (त्रिवेणी एडन) या निर्माणधीन इमारतीची माहिती दिली होती. या इमारतीचे काम लवकरच सुरु होणार असून याच इमारतीमध्ये त्यांना पाचव्या मजल्यावरील टू बीएचके ५०३ क्रमांकाचा फ्लॅट १ कोटी ३८ लाखांना देतो असे सांगितले. यावेळी त्याने त्यांना काही आगाऊ रक्कम भरुन फ्लॅट बुक करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी त्याला जानेवारी २०१५ ते जून २०१६ टप्याटप्याने ५३ लाख ५१ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. ही रक्कम त्रिवेणी डेव्हल्परच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर त्याने त्यांना फ्लॅटचे अलोटमेंट लेटर दिले होते.
याच दरम्यान त्यांना इमारतीच्या बांधकामात दुय्यम दर्जाचे मटेरियल वापरले जात असून इमारतीचे काम वेळेवर पूर्ण होणार नसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी मिहीरची भेट घेऊन त्यांच्यासोबत केलेला फ्लॅटचा व्यवहार रद्द केला होता. यावेळी मिहीरने त्यांना त्यांचे संपूर्ण पेमेंट काही दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले, फेब्रुवारी २०१८ ते २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने त्यांना १० लाख २१ हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित ४३ लाख ३० हजार दिले नाही. वारंवार विचारणा करुनही मिहीर त्यांना प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.
चौकशीदरम्यान मिहीर व त्याचे वडिल अशोक जेठवा यांनी अशाच प्रकारे अनेकांना फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले होते, मात्र कोणालाही फ्लॅटचा ताबा न देता ते दोघेही पळून गेले होते. त्यांच्याविरुद्ध उत्तर मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचे अनेक गुन्हे असल्याचे समजले होते. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मिहीर आणि अशोक जेठवा या दोघांना १७ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाने केरळ येथून अटक केली होती.
त्यांच्या अटकेचे वृत्त समजताच केवीन परेरा यांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मिहीर जेठवाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ४३ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीर व त्याचे वडिल अशोक जेठवा हे सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अशाच दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.