खिडकीतून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन आठ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दुकलीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२६
मुंबई, – बंद फ्लॅटच्या खिडकीतून प्रवेश करुन कपाटातील तिजोरीतून सुमारे आठ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारुन चोरीच्या दागिन्यांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी दोन आरोपींना मंगळवारी बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. शब्बीर सलीम खान आणि मुस्तफा इसा सिद्धीकी ऊर्फ भुवर अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून चोरीचे सुमारे पाच लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते, अखेर सहा महिन्यानंतर या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या अटकेने चोरीसह घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
३३ वर्षांची तक्रारदार महिला गोरेगाव येथील शहीद भगतसिंग नगर, जयहिंद चाळीत तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २०१९ साली तिचे लग्न झाले होते, लग्नात तिच्या माहेरच्या लोकांनी तिला काही सोन्याचे दागिने दिले होते, ते दागिने ती कपाटातील तिजोरीत ठेवत होती. २१ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता ती तिच्या पती आणि दोन्ही मुलांसोबत अंधेरीतील मिल्लतनगर, ओशिवरा गार्डनमध्ये फिरायला गेली होती. यावेळी तिने तिच्या घराची खिडकी उघडी ठेवली होती. रात्री पावणेदहा वाजता घरी आल्यानंतर तिला तिच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले.
खिडकीतून प्रवेश केलेल्या अज्ञात व्यक्तीने कपाटातील तिजोरीतून आठ लाख पंधरा हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या शब्बीर खान आणि मुस्तफा सिद्धीकी या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली देताना चोरीच्या दागिन्याच्या विक्री केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे पाच लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून इतर काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.