पोलीस असल्याची बतावणी करणारा तोतया अधिकारी गजाआड

लॉजमध्ये एक दिवस राहून पैसे न देता धमकावून निघून गेला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 नोव्हेंबर 2025
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करणार्‍या एका तोतया पोलीस अधिकार्‍याला गजाआड करण्यात अखेर बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. प्रकाश ज्ञानदेव जाधव ऊर्फ पक्या असे या 41 वर्षीय तोतया वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. गेल्या महिन्यांत एका लॉजमध्ये एक दिवस राहून पैसे न देता त्याने लॉजच्या कर्मचार्‍यांनाच बघून घेण्याची धमकी देऊन पलायन केले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकाश हा काहीच कामधंदा करत नसून त्याच्या नेहमीच्या विचित्र वागणुकीला त्याच्या कुटुंबियांसोबत मित्र कंटाळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

रतिकृष्ण रमावल्लभ पटनायक हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत मिरारोड येथे राहतात. त्यांचा गोरेगाव येथील लिंक रोड, शहीद भगतसिंग नगर क्रमांक दोनमध्ये खाना खजाना नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर त्यांच्या मालकीचे नेक्सान इन नावाचे एक लॉज आहे. 13 ऑक्टोंबरला दुपारी दिड वाजता त्यांच्या लॉजमध्ये प्रकाश नावाच्या एका व्यक्ती आला होता. त्याने तो गुन्हे शाखेचा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे असल्याचे सांगून व्हीआयपी बंदोबस्ताकामी गोरेगाव येथे आल्याचे सांगितले. आराम करण्यासाठी त्याने एका रुमची मागणी केली होती. त्यामुळे त्याला रुम क्रमांक 106 देण्यात आला होता.

लॉजच्या कर्मचार्‍याने त्याच्याकडे ओळखपत्रासह पैशांची मागणी केली, मात्र त्याने ओळखपत्र देण्यास नकार देत पोलिसांकडे पैसे मागतोस का असे विचारणा केली. रात्री साडेनऊ वाजता तो लॉजमधून निघून गेला आणि त्यांना बघून घेण्याची धम्की दिली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच रतिकृष्ण पटनायक यांनी घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगून संबंधित पोलीस अधिकार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन लॉजमध्ये प्रवेश करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

यावेळी लॉजच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपी तोतया पोलिसाचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड, पोलीस निरीक्षक अमीत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय सरोळकर, योगेश रंधे, पोलीस हवालदार कदम, पोलीस शिपाई गालवे, जाधव, हारुगडे, शिंदे यांनी प्रकाश जाधव याला गोरेगाव परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

तपासात प्रकाश हा मालाडच्या मालवणी, अंबुजवाडीत राहतो. पूर्वी तो माथाडी कामगार म्हणून काम करत होता. सध्या त्याच्याकडे काहीच काम नव्हते. बेरोजगार असलेल्या प्रकाशला त्याच्या घरासह सर्व मित्रमंडळी कंटाळून गेले होते. तो त्यांच्याकडे सतत खाण्यापिण्यासह पैशांची मागणी करत होता. काम करण्यास सांगूनही तो कामावर जात नव्हता. त्यामुळे त्याच्या अटकेची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगून त्याला जेलमध्ये टाका असे उलट पोलिसांना सांगितले.

अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला. मात्र जामिन देण्यासाठी सायंकाळपर्यंत कोणीही पुढे न आल्याने त्याला कारागृहात पाठविण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page