सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने व्यापार्याची फसवणुक
६६.७९ लाखांची कॅश घेऊन पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – शुद्ध सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकमधील एका व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ऍश्वर्ड विल्सन नावाच्या एका आरोपीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ऍश्वर्ड हा व्यापार्याकडील ६६ लाख ७९ हजाराची कॅश घेऊन पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.
आर प्रदीपकुमार हे मूळचे कर्नाटकचे रहिवाशी असून त्यांचा सोन्याचा दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. २०१९ साली बीकॉमचे शिक्षण घेत असताना त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख उज्जवल डुगलशी झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. सहा महिन्यांपूर्वी उज्जवलने त्यांना फोन करुन काही सोन्याच्या बिस्कीटचे फोटो पाठविले होते. त्याला सोन्याचे बिस्कीट हवे आहेत का अशी विचारणा करुन बिगर टॅक्स सोने देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे त्यांनी त्याला होकार दिला होता. काही दिवसांनी त्याने त्यांना ऍश्वर्डचा मोबाईल क्रमांक दिला होता. तो झव्हेरी बाजार येथील मोठमोठ्या बुलियन कंपन्यासाठी एजंट म्हणून काम करतो. त्याच्याकडे सव्वाकिलो शुद्ध सोन्याचे प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाचे बारा बिस्कीट आहेत, तो त्याला स्वस्तात ते बिस्कीट देईल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी ऍश्वर्डला फोन केला होता. यावेळी त्यांच्या टॅक्सविना शुद्ध सोन्याचे बिस्कीट खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. १ किलो २०० ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्यासाठी त्याने त्यांना ६७ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
ठरल्याप्रमाणे आर प्रदीपकुमार जानेवारी महिन्यांत मुंबईत आले होते. मुंबादेवी मंदिराजवळ त्यांची ऍश्वर्डशी भेट झाली. तिथे त्याने त्यांना शंभर ग्रम वजनाचे शुद्ध सोन्याचे एक सॅम्पल दाखविले होते. ते बिस्कीट खरे होते. त्यामुळे त्यांनी बाराशे ग्रॅम वजनाचे प्रत्येकी बारा सोन्याचे बिस्कीट देण्याचे मान्य करुन त्यांच्याकडून कॅश स्वरुपात ६६ लाख ७९ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तो त्यांना घेऊन एका शेठच्या कार्यालयाबाहेर आला. पैसे घेऊन ऍश्वर्ड सोन्याचे बिस्कीट घेऊन येतो सांगून निघून गेला आणि परत आला नाही. त्याला कॉल केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी उज्जवलला ही माहिती सांगितली. त्याने ऍश्वर्ड हा त्याचा मित्र असून त्याच्याकडून त्याची फसवणुक होणार नाही. त्यानंतर त्याने त्यांना त्याच्यासह त्याच्या चुलतीचा फोन दिला होता. या चुलतीला फोन केल्यानंतर ऍश्वर्डने तिची आठ लाखांची फसवणुक केल्याचे समजले.
सहा महिने उलटूनही त्याने सोन्याचे बिस्कीट किंवा बिस्कीटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. बाराशे ग्रॅम वजनाचे शुद्ध सोन्याचे बारा बिस्कीट देतो असे सांगून ऍश्वर्ड त्यांच्याकडील ६६ लाख ७९ हजार रुपये घेऊन पळून गेला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ऍश्वर्डविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.