उत्तराखंड येथून आणलेल्या हेरॉईनसह दोन आरोपींना अटक

३.२८ कोटीचा ६५१ ग्रॅम हेरॉईनसह कॅश आदी मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२६
मुंबई, – उत्तराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या हेरॉईनसह दोन आरोपींना कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आलमअली आणि नावेदअली अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तराखंडचे रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघेही हेरॉईन घेऊन मुंबईत आले होते. या हेरॉईनची विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ कोटी २८ लाखांचा ६५१ ग्रॅम हेरॉईनसह कॅश, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या सहकार्‍यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती, त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना कांदिवलीतील खजुरीया रोडवर काहीजण ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, विश्‍वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब बनसोडे, अमीत पाटील, सरला थोरात, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, विशाल तेजाळे, सहाय्यक फौजदार चंद्रसेन गायकवाड, गिरीश सुर्वे, पोलीस हवालदार संतोष वारिक, गोविंद सानप, विक्रांत खांडेकर, संतोष निजाई, बळीराम गोवळकर, सचिन खताते, एकनराथ जाधव, लक्ष्मण चव्हाण, महिला पोलीस हवालदार सोनाली लाडे, पोलीस शिपाई नरेश वरठा, सचिन वळतकर, महिला पोलीस शिपाई हिरा जाधव, जयश्री गोसावी आदी पथकाने खजुरीया रोडच्या महानगरपालिकेच्या गार्डनजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

रात्री उशिरा तिथे दोनजण आले होते, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ३ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे ६५१ ग्रॅम वजनाचे हेरॉईन, २ लाख १० हजाराची कॅश, ५० हजार रुपयांचे दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा ३ कोटी २८ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांनाही नंतर कांदिवली युनिटच्या कार्यालयात आणण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन याच गुन्ह्यांत नंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोघांनाही शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात दोन्ही आरोपी मूळचे उत्तराखंडचे रहिवाशी असून सध्या नालासोपारा येथे भाड्याच्या रुममध्ये राहत होते. त्यांनी ते हेरॉईन उत्तराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणले होते. ड्रग्ज तस्करीचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात ते दोघेही पकडले गेले. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page