मॉडेलच्या मदतीने सुरु असलेल्या हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
वेश्यादलाल महिलेस अटक तर एका मॉडेलची सुटका
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – मॉडेलिंग क्षेत्रातील तरुणीसह महिलांना पैशांचे आमिष दाखवून सुरु असलेल्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अपूर्वा भुजंग राव नावाच्या एका २६ वर्षांच्या वेश्यादलाल महिलेस खार पोलिसांनी अटक केली तर तिच्या तावडीतून एका मॉडेलची सुखरुप सुटका केली. मेडीकलनंतर तिला महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अपूर्वाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर तिला विशेष कोर्टाने शुक्रवार ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत एका महिलेचा सहभाग उघडकीस आले असून तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
अंधेरीतील ओशिवरा परिसरात राहणारी अपूर्वा नावाच्या एका महिलेच्या संपर्कात काही मॉडेल आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणार्या काही तरुणीसह महिलांना पैशांचे आमिष दाखवून ती त्यांना वेगवेगळ्या ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी पाठवते. त्यांना पश्चिम उपनगरातील विविध नामांकित हॉटेल, लॉज आणि गेस्टहाऊसमध्ये पाठवून ती सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे यांना मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत खार पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने अपूर्वाला संपर्क साधून तिच्यााकडे एका मॉडेलची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यात फोनवरुन सर्व आर्थिक व्यवहार ठरला होता. या व्यवहारानंतर या बोगस ग्राहकाने तिला मॉडेल घेऊन खार येथील एस. व्ही रोड, रामकृष्ण नगर, हॉटेल रामी गेस्टलाईनमध्ये बोलाविले होते. ग्राहकाकडून ही माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत कुंभारे, दिपाली गायकवाड, पोलीस शिपाई महेश लहामगे, नितीन कोळेकर, विशाल भामरे, सुमित अहिवळे, श्रद्धा सस्ते आदी पथकाने हॉटेल रामी गेस्टलाईनमध्ये साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ठरल्याप्रमाणे रविवारी अपूर्वा ही एका मॉडेल तरुणीसह तिथे आली होती. यावेळी ग्राहकासोबत तिचे आर्थिक व्यवहार सुरु असताना या पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत अपूर्वाला ताब्यात घेऊन बळीत मॉडेलची पोलिसांनी सुटका केली. तिच्या चौकशीतून ती ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होती. तिच्या संपर्कात असलेल्या मॉडेलला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे उघडकीस आले.
या घटनेनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला सोमवारी दुपारी विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्आने तिला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत खेळातील नोटा, २२ हजाराची कॅश, अडीच लाखांचे दोन आयफोन असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बळीत मॉडेलला नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते, मेडीकलनंतर तिला महिला वसतिगृहात पाठविण्यात आले. आतापर्यंतच्या चौकशीत अपूर्वासह अन्य एक महिला अशाच प्रकारे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे हे करत आहेत.