वरळीतील वेगवेगळ्या अपघातात वयोवृद्धेसह दोन महिलांचा मृत्यू
अपघातप्रकरणी टँकरसह बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – वरळी परिसरात सोमवारी सकाळी दोन वेगवेगळ्या अपघातात एका वयोवृद्धेसह दोनम महिलांचा मृत्यू झाला. वनमाला राम साबळे (५९) आणि सावित्रीदेवी चंद्रसिंग चौहाण (६२) अशी मृत महिलांची नावे असून त्या दोघीही वरळी धारावीतील रहिवाशी आहेत. याप्रकणी वरळी पोलिसांनी टँकरसह बसचालकाविरुद्ध दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोन्ही महिलांच्या अपघाती मृत्यूने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
पहिला अपघात अकरा वाजून वीस मिनिटांनी वरळीतील पांडुरंग भूतकर मार्ग, जय मल्हार हॉटेलसमोर झाला. सावित्रीदेवी चौहाण ही वयोवृद्ध महिला वरळीतील दुरदर्शनजवळील सेंच्युरी कॉलनीत राहते. सकाळी ती जय मल्हार हॉटेलसमोरुन जात होती. यावेळी तिला एका पाण्याच्या टँकरने धडक दिली होती. या अपघातात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे सावित्रीदेवीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघात करणारा टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. काही वेळानंतर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या अपघाताची ताजी असताना दुसरी घटना अकरा वाजून बावीस मिनिटांनी वरळीतील मेला जंक्शन, दक्षिण बॉण्ड सिग्नलजवळझाला. मुंबई सेंट्रल बेस्ट आगारातून निघालेली बस क्रमांक १५४ ही मेला जंक्शनजवळ येताच बसचालकाने वनमाला साबळे या ५९ वर्षांच्या महिलेला धडक दिली होती. यावेळी बसच्या वाहकाने जखमी महिलेला टॅक्सीने तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताला जबाबदार असलेल्या बेस्ट बसचा चालकाला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.