गार्मेटसह सुपर मार्केट व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

३५.६३ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – गार्मेटसह सुपर मार्केट व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकासह त्याच्या मित्रांची सुमारे ३५ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सौम्या राकेश भारद्वाज या महिलेविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिच्या पतीचा कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी तिच्या पतीच्या मित्रांकडून त्यांची सौम्या या महिलेशी ओळख झाली होती. ती गोरेगाव येथील मोतीलाल नगर, शेठीया अपार्टमेंटमध्ये राहते. तिने तिचा गार्मेटसह सुपर मार्केटचा व्यवसाय असल्याचे सांगून त्यांना तिच्या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर तिने सात ते आठ टक्के व्याज देण्याचे आश्‍वासन देत त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या महिलेने तिच्या बचतीतून तिला साडेचार लाख रुपये दिले होते. या गुंतवणुकीवर तिला तिने मार्च ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत नियमित व्याज दिले होते. त्यामुळे तिला तिच्यावर विश्‍वास बसला होता. याच दरम्यान सौम्याने तिला आणखीन पैसे गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने तिच्या फ्लॅट विक्रीसह सोन्याचे दागिने गहाण ठेवून तिला आणखीन पैसे दिले होते. अशा प्रकारे तिच्या पतीसह मित्रांनी सौम्याला गार्मेटसह सुपर मार्केटच्या व्यवसायासाठी तिला ५९ लाख २३ हजार रुपये दिले होते. काही महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर तिने व्याजाची रक्कम देणे बंद केले.

याबाबत चौकशी केली असता सौम्या हिचा कुठलाही गार्मेंटसह सुपर मार्केटचा व्यवसाय नसल्याचे त्यांना समजले. व्यवसायाची खोटी माहिती देऊन तिने त्यांच्याकडून घेतलेले पैसे तिचा मित्र इशा दिवान याच्यावर खर्च केल्याचे सांगून तुम्हाला पैसे मिळणार नाही. तसेच पैशांची मागणी केल्यास त्यांना बोगस ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक करण्यास प्रवृत्त करु अशी धमकी दिली होती. व्याजापोटी तिने आतापर्यंत तिने २३ लाख ६० हजार रुपये परत केले, मात्र ३५ लाख ६३ हजाराचा परस्पर अपहार करुन या महिलेच्या पतीसह मित्रांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी सौम्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच सौम्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page