सोन्याच्या बारसाठी घेतलेल्या १.१० कोटीचा अपहार करुन फसवणुक

सॅमको ऍण्ड कंपनीच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२६
मुंबई, – स्वस्तात सोन्या-चांदीचे बार देतो असे सांगून एका ज्वेलर्स व्यापार्‍याला त्याच्याच परिचित व्यापार्‍याने एक कोटी दहा लाखांना गंडा घातला. बारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी शादाब रज्जाक पटेल या सॅमको ऍण्ड कंपनीच्या मालकाविरुद्ध पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शादाबने बारच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

३७ वर्षांचे तक्रारदार मूळचे कोलकाताच्या परागानाचे रहिवाशी असून ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा तिथेच सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांची शादाब पटेलशी ओळख झाली होती. शादाब हा मॅसको ऍण्ड कंपनीचा मालक चिंचबंदर येथील इसराईल मोहल्ला, सॅम्युअल स्ट्रिट परिसरात त्याची एक खाजगी कंपनी आहे. त्याने त्यांना स्वस्तात सोन्या-चांदीचे बार देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याला अनेकदा सोन्या-चांदीचे बारचे ऑर्डर दिले होते.

सुरुवातीला ऑर्डर वेळेवर डिलीव्हरी करुन त्याने त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनीही त्याला मोठी ऑर्डर देण्यास सुरुवात केली होती. मे महिन्यांत त्याने त्याला एक कोटी दहा कोटी रुपयांचे २७ किलो चांदी आणि तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे बारची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून आगाऊ पेमेंट घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना सोन्या-चांदीचे बार पाठविले नाही. विचारणा केल्यानंतर तो वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्यचा प्रयत्न करत होता.

दोन महिने उलटूनही त्याने बारची डिलीव्हरी केली नव्हती. त्यामुळे ते स्वत मुंबईत आले होते. यावेळी त्यांना शादाब हा त्याच्या कार्यालयाला टाळे लावून पळून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याला मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईल क्रमंाक ब्लॉक केला होता. शादाबने एक कोटी दहा लाख रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे २७ किलो चांदी आणि तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार पाठविले नाही.

तसेच त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शादाब पटेल याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page